Nana Patekar: सेटवर असं काय घडलेलं? ज्यानंतर तनुश्री दत्ता तडकाफडकी निघाली; नाना पाटेकरांवर केले गंभीर आरोप

तनुश्रीच्या प्रतिक्रियेवर टीका होत असतानाच अभिनेत्री संध्या मृदुल आणि गायिका सोना महापात्रा यांनी तिच्या समर्थनार्थ भूमिका मांडली. एखाद्या व्यक्तीच्या निधनामुळे कथित गैरवर्तनामुळे झालेल्या वेदना पुसल्या जात नाहीत, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.

Nana Patekar: सेटवर असं काय घडलेलं? ज्यानंतर तनुश्री दत्ता तडकाफडकी निघाली; नाना पाटेकरांवर केले गंभीर आरोप
Tanushree Dutta and Nana Patekar
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 13, 2026 | 9:35 AM

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीतून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात असतानाच अभिनेत्री तनुश्री दत्ता हिच्या प्रतिक्रियेमुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. नाना पाटेकर यांच्या निधनानंतर तनुश्रीने सोशल मीडियावर केलेल्या विधानांमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 2008 मध्ये ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटाच्या सेटवर नाना पाटेकर यांनी छळ केल्याचा आरोप तनुश्रीने केला होता. 2018 मध्ये भारतात #MeToo (मी टू) चळवळीला वेग आला, तेव्हा या प्रकरणाची देशभर चर्चा झाली होती. आता नानांच्या निधनानंतर तनुश्री त्यांच्याबद्दल सातत्याने नकारात्मक वक्तव्ये करताना दिसत आहे. ‘हॉर्न ओके प्लीज’च्या सेटवर असं नेमकं काय घडलं होतं, त्याबद्दल जाणून घेऊयात..

कोण आहे तनुश्री दत्ता?

तनुश्री दत्ता ही अभिनेत्री आणि माजी सौंदर्यवती आहे. 2004 मध्ये ‘फेमिना मिस इंडिया युनिव्हर्स’ हा किताब जिंकल्यानंतर तिला मनोरंजनविश्वात ओळख मिळाली. त्यानंतर तिने हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं. ‘आशिक बनाया आपने’ या चित्रपटामुळे ती विशेष चर्चेत आली. मात्र, अभिनय कारकिर्दीपेक्षा 2018 मध्ये तिने केलेल्या आरोपांमुळे तिचं नाव देशभर गाजलं. बॉलिवूडमधील प्रभावशाली व्यक्तींविरोधात आवाज उठवणाऱ्या महिलांमध्ये तनुश्रीचं नाव महत्त्वाचं ठरलं.

Loading...

नाना पाटेकर यांच्यावर काय केले होते आरोप?

तनुश्री दत्ताने 2008 मध्ये ‘हॉर्न ओके प्लीज’ चित्रपटातील एका गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान नाना पाटेकर यांनी अयोग्य वर्तन केल्याचा आरोप केला होता. गाण्याच्या चित्रीकरणावेळी नानांनी आपल्याशी गैरवर्तन केल्याचा तिचा दावा होता. या घटनेनंतर तिने विरोध केल्याचंही तिने सांगितलं होतं. मात्र, नाना पाटेकर यांनी हे आरोप फेटाळून लावले होते. 2018 मध्ये तनुश्रीने हा विषय पुन्हा सार्वजनिक केल्यानंतर बॉलिवूडमध्ये #MeToo चळवळीला मोठी प्रसिद्धी मिळाली. अनेक महिलांनी कामाच्या ठिकाणी झालेल्या कथित गैरवर्तनाबाबत आपले अनुभव मांडले. त्यामुळे चित्रपटसृष्टीतील सुरक्षितता, महिलांचा सन्मान आणि कामाच्या ठिकाणी होणारा छळ यांवर व्यापक चर्चा सुरू झाली.

नानांच्या निधनानंतर तनुश्रीने काय म्हटलं?

8 ऑक्टोबर 2026 रोजी नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर तनुश्री दत्ताच्या प्रतिक्रियेने सर्वांचं लक्ष वेधलं. तिने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये ‘Evil dead’ असं म्हटलं. या विधानामुळे सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी तिच्या शब्दांवर आक्षेप घेतला, तर काहींनी तिने मांडलेल्या अनुभवाकडेही लक्ष देण्याची गरज व्यक्त केली. तनुश्रीने नंतरही तिच्या भूमिकेचं समर्थन केलं. एखाद्या व्यक्तीच्या निधनामुळे त्या व्यक्तीविषयीचे आरोप किंवा संबंधित व्यक्तीला झालेल्या मानसिक त्रासाच्या आठवणी आपोआप संपतात का, असा प्रश्न या चर्चेतून उपस्थित केला. दुसरीकडे, नानांच्या निधनानंतर अशा प्रकारची भाषा वापरणं अयोग्य असल्याची टीकाही करण्यात आली.

प्रकरणात पुढे काय झालं?

तनुश्रीने केलेल्या आरोपांनंतर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं. मात्र, 2019 मध्ये पुरेशा पुराव्याअभावी पोलिसांनी प्रकरण बंद करण्याचा अहवाल सादर केला होता. नाना पाटेकर यांनी सुरुवातीपासूनच आरोप नाकारले होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us