
बॉलिवूड असो किंवा हॉलिवूड सेलिब्रिटी, अनेकांसाठी 2025 हे वर्ष खूप खास ठरलं. अनेकांचे सुपरहिट चित्रपट आले, अनेक सेलिब्रिटींनी लग्नगाठ बांधली, तर काहींनी घरी चिमुकल्या पाहुण्याचे स्वागतही केलं. दिग्गज कलाकारांपासून ते नवविवाहित जोडप्यांपर्यंत, अनेकांनी बाळाच्या आगमनाची हृदयस्पर्शी घोषणा केली आणि काहींनी बाळाचं नावही जाहीर केलं. कोणकोण आहेत ते सेलिब्रिटी जाणून घेऊया.
कतरिना कैफ-विकी कौशल
7 नोव्हेंबर 2025 रोजी कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी त्यांच्या पहिल्या मुलाचे, एका बाळाचे स्वागत केले. या जोडप्याने एका संयुक्त पोस्टद्वारे ही आनंदाची बातमी जाहीर केली. त्याआधी त्यांनी प्रेग्नन्सीची बातमीही शेअर केली होती.
या घोषणेमुळे बॉलिवूडमध्ये उत्साह पसरला आणि दोघांवर अभिनंदनाचा वर्षाव झाला. काही तासांतच, चित्रपटसृष्टीतील अनेक मित्र आणि हितचिंतकांनी प्रतिक्रिया देत त्यांना नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. भारतीय चित्रपटसृष्टीतील दोन्हीही प्रस्थापित नावे असलेल्या कतरिना आणि विकी यांच्यासाठी मुलाचं आगमन हा नवा अध्याय आहे.
अथिया शेट्टी – के.एल राहुल
2025 च्या सुरूवातीलाच अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटर के.एल राहुल हे एका गोड मुलीचे आई-बाबा झाले. 24 मार्चला त्यांनी एका साधी, सोपी, गुड न्यूज शेअर करत लेकीचे आगमन झाल्याचे सांगितले. त्याआधी नोव्हेंबर 2024 मध्येच त्यांनी प्रेग्नन्सीची घोषणा केली. इवारा(Evaarah) असं त्यांच्या मुलीचं नाव आहे. इवाराचा अर्थ म्हणजे देवाने दिलेली भेट, असं केएलने सांगितलं होतं.
परिणीती चोप्रा- राघव चढ्ढा
अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राजकारणी राघव चढ्ढा यांच्या घरी 19 ऑक्टोबर 2025 मध्ये मुलाचे आगमन झालं. सर्वांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. ‘नीर’ असं त्यांच्या लाडक्या लेकाचं नाव असून त्याच्या आगमनाने आपलं आयुष्य पूर्ण झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली होती.
कियारा अडवाणी-सिद्धार्थ मल्होत्रा
शेरशाह चित्रपटाच्या सेटवर सूत जुळल्यावर कियारा आणि सिद्धार्थ काही वर्षांपूर्वी लग्नबंधनात अडकले.15 जुलै 2025 रोजी कियाराने गोड मुलीला जन्म दिला. सर्वांसोबत ही गुड न्यूज त्यांनी शेअर केली. तर काही दिवसांपूर्वी, नोव्हेंबर 2025 मध्येच त्यांनी लेकीचं नावही जाहीर केलं. कियारा आणि सिद्धार्थ याच्या लाडक्या लेकीचं नाव ‘सरायाह मल्होत्रा’ असं आहे. ‘आमच्या प्रार्थनांपासून आमच्या बाहूंपर्यंत, दैवी आशीर्वादापासून आमच्या राजकुमारीपर्यंत..’ असं कॅप्शन देत दोघांनी मुलीचं नाव सांगितलं . हे नाव हिब्रू शब्द सारापासून प्रेरित आहे, असं म्हटलं जातं.
राजकुमार राव- पत्रलेखा
15 नोव्हेंबर 2025 , लग्नाच्या चौथ्या वाढदिवशीच अभिनेता राजकुमार राव आणि त्याची पत्नी, अभिनेत्री पत्रलेखा यांनी त्यांच्या मुलीच्या जन्माची घोषणा केली. हे सर्वात सुंदर ब्लेसिंग , आशिर्वाद असल्याचे सांगत त्यांनी ही गुड न्यूज शेअर केली. सर्वांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत नव्या आयुष्यासाठी शुभेच्छाही दिल्या.
अरबाज आणि शुरा खान
दंबग स्टार सलमान खान याचा भाऊ, अभिनेता अरबाज खान आणि पत्नी शुरा खान हेही यावर्षी पालक बनले. 5 ऑक्टोबर 2025 ला त्यांच्या घरी लाडक्या लेकीचं आगमन झालं. शुराने गोंडस मुलीला जन्म दिला. सिपारा खान असं तिचं नावही त्यांनी जाहीर केलं.