
चित्रपटसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध चित्रपट अभिनेते संजय खान यांच्या पत्नी, आणि सुझान खानची आई झरीन खान यांचे निधन झाले आहे. वयाच्या 81व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीतील लोकांमध्ये शोकाची लाट पसरली आहे. सध्या मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही.अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत.
झरीन खान या काही काळापासून वृद्धत्वाशी संबंधित आजारांनी त्रस्त होत्या. त्यांनी आज सकाळी मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. झरीन यांच्या पश्चात त्यांचे पती आणि मुले सुझान खान, सिमोन अरोरा, फराह अली खान आणि झैद खान हे आहेत.
झरीन खान यांच्याविषयी
संजय आणि झरीन यांची भेट बसस्टॉपवर झाली होती. सुरुवातीला त्यांच्यामध्ये मैत्रिचे नाते होते. हळूहळू त्यांच्या मैत्रिचे प्रेमात रुपांतर झाले. त्यांनी १९६६ मध्ये लग्न केले. त्या ‘तेरे घर के सामने’ आणि ‘एक फूल दो माली’ यासारख्या चित्रपटांमध्ये दिसल्या होत्या. त्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये फारश्या सक्रिय नव्हत्या.
वाढदिवशी सुझान खानने केली होती पोस्ट
याच वर्षी जुलै महिन्यात, सुझान खानने आईच्या ८१व्या वाढदिवशी एक पोस्ट शेअर केली होतीय. तिने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत आईला शुभेच्छा दिल्या आहेत. व्हिडीओ शेअर करत सुझानने “माझी आई. मम मम्मीया.. तू किती अद्भुत आई आहेस. माझ्या सुंदर, गॉर्जियस मॉमीला खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा.. मी जे काही करते आणि माझ्या आयुष्यात मी जे काही मिळवले आहे ते केवळ तू मला शिकवलेल्या गोष्टींमुळे… मी तुझी छोटी मुलगी असल्याचा मला खूप अभिमान आहे… हे विश्व नेहमी तुझी रक्षण करो.. !!!” या आशयाची पोस्ट केली आहे.