15 वर्षे त्रासदायक लग्नापेक्षा 5 वर्षे लिव्ह-इनमध्ये..; 74 वर्षीय झीनत अमान स्पष्टच बोलल्या..
74 वर्षीय झीनत अमान यांनी लग्न आणि लिव्ह इन रिलेशनशिपबद्दल त्यांची मनमोकळी मतं मांडली आहेत. त्याचसोबत लग्नाचा विचार करणाऱ्यांना सल्लासुद्धा दिला आहे. त्रासदायक लग्नापेक्षा लिव्ह-इन बरं, असं त्या थेट म्हणाल्या आहेत.

झीनत अमान या हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री आहेत. त्यांनी एकेकाळी बॉलिवूड गाजवलं होतं. बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्रींमध्ये त्यांचं नाव आवर्जून घेतलं जायचं. 74 वर्षीय झीनत अमान त्यांच्या मॉडर्न आणि बिनधास्त विचारांसाठीही ओळखल्या जातात. आपल्या अटी-शर्तींवर जीवन जगणं त्यांना आवडतं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्या लग्न आणि लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल मोकळेपणे व्यक्त झाल्या आहेत. या मुलाखतीत त्यांनी थेट लोकांना लग्नाआधी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा सल्ला दिला आहे.
झीनत अमान अनेकदा नातेसंबंधांविषयी त्यांचं मत मोकळेपणे व्यक्त करतात. लग्नाआधी लिव्ह- इन रिलेशनशिपमध्ये राहणं गरजेचं आहे, असं त्यांचं स्पष्ट मत आहे. हल्लीच्या काळात लग्न करण्याआधी जोडप्याने एकमेकांसोबत राहणं अधिक गरजेचं असल्याचं त्या म्हणतात. आयुष्यभरासाठीच्या बंधनात अडकण्यापूर्वी जोडीदारासोबत आपली कम्पॅटिबिलिटी तपासून पाहणं, समजणं गरजेचं असतं, असं झीन अमान म्हणाल्या.
लिव्ह-इनबद्दल काय म्हणाल्या?
‘फ्लिप द स्क्रिप्ट विथ शुभ्रा’ या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत झीनत अमान पुढे म्हणाल्या, “हल्लीच्या काळात आणि भूतकाळाचाही विचार केला तरी कोणतीच गोष्ट कायमची राहत नाही, टिकत नाही. कायदेशीररित्या लग्नाच्या बंधनात अडकण्यापूर्वी तुम्ही कम्पॅटिबिलिटी तपासून पाहणं गरजेचं आहे. माझं हे स्पष्ट मत आहे. तुम्ही मानसिक आणि भावनिकदृष्ट्या एकमेकांसाठी योग्य आहात की नाही, हे तुम्हाला माहीत असायला हवं. जर तुम्ही मुलं जन्माला घालण्याचा विचार करत असाल तर तुम्ही त्यांचं संगोपन कसं कराल? पैशांविषयी तुमचे काय विचार आहेत? जर दोन जणांमध्ये कोणताच ताळमेळ नसेल तर अशी नाती काय कामाची? 15 वर्षे कठीण आयुष्य जगण्यापेक्षा तुम्ही 5 वर्षे आनंदी आयुष्य जगणं पसंत करणार नाही का? माझं तर हेच मत आहे.”
तरुणाईला सल्ला
“नात्यात एकमेकांबद्दल आदर असायला हवा, दोघांनी एकमेकांसाठी प्रयत्न केले पाहिजेत. कारण वेळेनुसार नाती बदलत जातात. नातेसंबंधांवर कायम काम करत राहावं लागतं. तुम्ही नेहमीच हनिमून फेजमध्ये राहाल, अशी अपेक्षा ठेवणंच चुकीचं आहे. जर नातं टिकवायचं असेल तर तुम्हाला तडजोड स्वीकारावीच लागेल. नात्यात वेळेनुसार, काळानुसार एकमेकांबद्दलची अटॅचमेंटसुद्धा बदलते. त्यामुळे नाती टिकवण्यासाठी काही काळाच्या रोमान्सवर अवलंबून राहण्याऐवजी कमिटमेंटचा विचार करावा”, असा सल्ला त्यांनी तरुणाईला दिला आहे.
वैयक्तिक आयुष्य
झीनत अमान यांनी 1978 मध्ये अभिनेते संजय खान यांच्याशी लग्न केलं होतं. त्यावेळी संजय खान हे आधीच विवाहित आणि चार मुलांचे पिता होते. त्यांच्यावर मारहाण आणि शारीरिक हिंसेचे आरोप केल्यानंतर झीनम अमान यांनी 1979 मध्ये घटस्फोट घेतला. त्यानंतर त्यांनी 1985 मध्ये अभिनेते मजहर खान यांच्याशी दुसरं लग्न केलं. 1998 मध्ये मजहर यांचं निधन झालं. 1999 मध्ये सिमी ग्रेवाल यांच्या शोमध्ये झीनम अमान यांनी अशी कबुली दिली होती की, त्या मजहर खान यांच्यासोबतही खुश नव्हत्या. त्यांनी यापूर्वीही सांगितलं आहे की, त्या त्यांच्या मुलांनाही लग्नाआधी जोडीदारासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा सल्ला देतात. झीनत अमान यांना मजहर खान यांच्यापासून दोन मुलं आहेत. त्यांचा मोठा मुलगा अझान खान हा दिग्दर्शक असून धाकटा जहान खान संगीतकार आहे.