Zubeen Garg Funeral : झुबीन गर्गला अखेरचा निरोप, हात जोडून रडली पत्नी, लोटला जनसागर; हृदयद्रावक दृश्य

Zubeen Garg Funeral : गायक झुबीन गर्गच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पत्नी गरीमा गर्ग हात जोडून रडत होती, तर बहिणीने पार्थिवाला मुखाग्नी दिला. झुबीनला अखेरचा निरोप देण्यासाठी चाहत्यांचा जनसागर लोटला होता.

Zubeen Garg Funeral : झुबीन गर्गला अखेरचा निरोप, हात जोडून रडली पत्नी, लोटला जनसागर; हृदयद्रावक दृश्य
गायक झुबीन गर्ग अनंतात विलीन
Image Credit source: Instagram
Updated on: Sep 23, 2025 | 1:40 PM

Zubeen Garg Funeral: प्रसिद्ध गायक झुबीन गर्ग अनंतात विलीन झाला आहे. 19 सप्टेंबर रोजी सिंगापूरमध्ये स्कूबा डाइव्हिंगदरम्यान त्याचं निधन झालं होतं. त्यानंतर आज मंगळवारी 23 सप्टेंबर रोजी त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आसाममधील कमरकुची गावातील उत्तरी कॅरोलिना इथं झुबीनच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्याची पत्नी पार्थिवाच्या शेजारी हात जोडून बसली होती. झुबीनच्या निधनाने तिला अश्रू अनावर झाले होते. तर बहीण पाल्मी बोरठाकूरने झुबीनला मुखाग्नी दिला. त्याला अंतिम निरोप देण्यासाठी हजारो चाहत्यांनी गर्दी केली होती. गुवाहाटीतील अर्जुन भोगेश्वर बरूआ क्रीडा संकुलापासून ते स्मशानभूमीपर्यंतच्या अंत्ययात्रेत असंख्य चाहते सहभागी झाले होते.

झुबीनच्या शेजारी हात जोडून बसलेली त्याची पत्नी गरीमा गर्गचं दृश्य हृदयद्रावक होतं. गेल्या पाच दिवसांपासून तिच्या मनात जी शून्यतेची भावना होती, ती तिच्या चेहऱ्यावर दिसून येत होती. पतीच्या चितेसमोर हात जोडून प्रार्थना करत असलेल्या गरीमाला पाहून सर्वांनाच अश्रू अनावर झाले. तर स्मशानभूमीत उपस्थित असलेले चाहते झुबीनचं प्रसिद्ध गाणं ‘मायाबिनी’ गात राहिले. झुबीनच्या लोकप्रिय गाण्यांपैकी हे एक गाणं होतं. अत्यंत भावूक वातावरणात त्याला अंतिम निरोप देण्यात आला.

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

सिंगापूरमधील रुग्णालयानंतर गुवाहाटी मेडिकल कॉलेज रुग्णालयात झुबीनच्या पार्थिवावर दुसऱ्यांदा पोस्टमॉर्टम करण्यात आलं. नॉर्थ ईस्ट इंडिया फेस्टिव्हलमध्ये परफॉर्म करण्यासाठी झुबीन सिंगापूरला गेला होता. तिथे स्कूबा डाइव्हिंग करताना त्याचा मृत्यू झाला. झुबीनचा बुडून मृत्यू झाल्याचं सिंगापूरमधल्या रुग्णालयाने त्याच्या मृत्यू प्रमाणपत्रात स्पष्ट केलं. त्यानंतर विमानाने त्याचं पार्थिव गुवाहाटीला आणण्यात आलं. रविवारी संपूर्ण दिवसभर आणि रात्रीसुद्धा चाहते रांगेत उभं राहून झुबीनच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी तासनतास प्रतीक्षा करत होते. झुबीनच्या निधनाने संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.

झुबीनला अखेरचा निरोप

झुबीनच्या अंत्ययात्रेत लोटला जनसागर

झुबीनच्या मृत्यूबाबत बऱ्याच शंका उपस्थित केल्या जात होत्या. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सिंगापूर सरकारद्वारे जारी केलेल्या झुबीनच्या मृत्यू प्रमाणपत्राचा खुलासा केला होता. या प्रमाणपत्रानुसार झुबीनचा मृत्यू पाण्यात बुडाल्याने झाला आहे. त्याच्या पार्थिवावर गुवाहाटीजवळील गावात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.