
भारतातील लोकांच्या आरोग्याबाबत केलेल्या नव्या अभ्यासाचा अहवाल चिंता वाढवणारा आहे. असंसर्गजन्य आजारांसोबतच (NCDs) देशात कॅन्सरच्या रुग्णांची झपाट्याने वाढ होतेय. गेल्या वर्षी जागतिक आरोग्य दिनानिमित्त अपोलो रुग्णालयाने एका अभ्यासाचा अहवाल जारी केला. त्यात त्यांनी भारताचा उल्लेख ‘जगातील कर्करोगाची राजधानी’ असा केला. आरोग्याच्या बाबतीत समोर येणारी आकडेवारीसुद्धा विचार करायला भाग पाडणारी आहे. एक तृतीयांश भारतीय प्री-डायबेटिक आहेत, दोन तृतीयांश लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे आणि दर दहापैकी एक नैराश्यग्रत आहे. त्यातही जागतिक सरासरीपेक्षा जास्त असलेल्या कर्करोगाच्या रुग्णांची संख्या ही विशेष चिंतेची बाब आहे. या अभ्यासानुसार, 2020 मध्ये दरवर्षी होणाऱ्या कॅन्सरच्या रुग्णांची संख्या जवळजवळ 1.4 दशलक्ष होती. ती 2025 पर्यंत 1.57 दशलक्ष होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कारणं काय? बदललेली जीवनशैली, पर्यावरणीय आणि सामाजिक-आर्थिक आव्हानं या सर्वांमुळे भारतात कॅन्सर रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचं म्हटलं जातंय. यामागे इतरही बरीच कारणं आहेत. धुम्रपान आणि इतर माध्यमातून...