कुठे लॉकडाऊन तर कुठे नाईट कर्फ्यू, देशातील कोणत्या शहरात काय?; वाचा सविस्तर

| Updated on: Apr 07, 2021 | 10:52 AM

देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत असून काही ठिकाणी लॉकाडऊन, वीकेंड लॉकडाऊन आणि रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. (Complete List of Cities Under Partial Coronavirus Lockdown, Night Curfews)

कुठे लॉकडाऊन तर कुठे नाईट कर्फ्यू, देशातील कोणत्या शहरात काय?; वाचा सविस्तर
Lockdown
Follow us on

मुंबई: देशभरात कोरोनाचा हाहाकार सुरू आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत असून काही ठिकाणी लॉकाडऊन, वीकेंड लॉकडाऊन आणि रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. काही राज्यांमध्ये अजूनही शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्यात आले आहेत. कोणत्या राज्यात कोरोनामुळे काय निर्णय घेण्यात आले, त्यावर टाकलेला हा प्रकाश. (Complete List of Cities Under Partial Coronavirus Lockdown, Night Curfews)

मुंबईत काय?

मुंबईत काल कोरोना रुग्णांच्या संख्येनं 10 हजाराचा टप्पा ओलांडला आहे. तर 7 हजार 19 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत सध्या 77 हजार 495 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मुंबईत काल दिवसभरात 31 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांपैकी 19 जणांना काही दीर्घकालीन आजार होते. तर मृतांमध्ये 20 पुरुष आणि 11 महिलांचा समावेश आहे. अजून एक चिंताजनक बाब म्हणजे मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी 38 दिवसांवर येऊन ठेपलाय. तर बरे झालेल्या रुग्णांचा दर 81 टक्के आहे. 30 मार्च ते 5 एप्रिल पर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर 1.79 टक्के झाला आहे. त्यामुळे मुंबईत वीकेंड लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. तसेच मुंबईसह संपूर्ण राज्यात दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी लागू केली आहे.

महाराष्ट्रात परिस्थिती नियंत्रणाबाहेर

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रचंड हाहाकार उडाला आहे. राज्यात दिवसाला 50 हजार रुग्ण सापडत आहेत. देशात जेवढे नवे रुग्ण सापडले आहेत, त्यापैकी 50 टक्के रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहे. त्यामुळे राज्यात वीकेंड लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. तसेच दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, राज्यातील काही जिल्ह्यात आठ आठ दिवसाचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. राज्य सरकारने लॉकडाऊनचे सर्व अधिकार जिल्हाधिकारी आणि स्थानिक प्रशासनाला दिले आहेत.

दिल्लीत नाईट कर्फ्यू

दिल्लीतही कोरोनाचे रुग्ण वाढल्याने मंगळवारपासून दिल्लीत नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. रात्री 10 वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजेपर्यंत हा नाईट कर्फ्यू असणार आहे. रात्रीच्या संचारबंदीमधून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे. दरम्यान, दिल्ली सरकारने पुन्हा लॉकडाऊन करण्यास नकार दिला आहे. लग्न, अत्यंविधी आणि इतर कार्यक्रमांसाठीही दिल्ली सरकारने नियमावली जारी केली आहे

गुजरातमध्ये 20 शहरात रात्रीची संचारबंदी

गुजरातमध्ये 20 शहरांमध्ये रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच लग्न समारंभातील संख्येवरही मर्यादा घालण्यात आली आहे. लग्नसमारंभात केवळ 100 लोकांच्या उपस्थितीचं बंधन घालण्यात आलं आहे. त्यापेक्षा अधिक लोकांना उपस्थित राहण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच रात्री 8 पासून ते पहाटे 6 वाजेपर्यंत या 20 शहरांमध्ये संचारबंदी लागू करणअयात आली आहे. 30 एप्रिलपर्यंत ही संचारबंदी लागू असणार आहे. तसेच 30 एप्रिलपर्यंत राज्यातील सर्व कार्यालये शनिवारी बंद राहणार आहेत.

मध्यप्रदेशात प्रत्येक रविवारी लॉकडाऊन

मध्यप्रदेशात इंदूर, भोपाळ आणि जबलपूर या तीन जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे या तिन्ही जिल्ह्यात प्रत्येक रविवारी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. सात महिन्यानंतर मध्यप्रदेशात हा लॉकडाऊन करण्यात आला आहे. राज्यात 23 मार्चपासून संकल्प अभियान सुरू करण्यात येणार आहे. नागरिकांनी मास्क लावावं, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं, यासाठी हे अभियान राबवण्यात येणार आहे, असं मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितलं. तसेच जिल्ह्यात प्रत्येक दिवशी सकाळी 11 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता सायरन वाजवण्यात येईल. तसेच लोकांना दोन मिनिटं थांबवून सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचा संकल्प करवून घेतला जाणार आहे.

पंजाबात 11 जिल्ह्यात नाईट कर्फ्यू

पंजाबमध्ये दररोज अडीच हजार करोनाचे रुग्ण सापडत आहेत. त्यावर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे केंद्राने पंजाबमध्ये मॉनिटरिंगसाठी हाय लेव्हल टीम पाठवली आहे. राज्यात 11 जिल्ह्यात 10 एप्रिलपर्यंत आधीच रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

छत्तीसगडमध्ये केंद्राची टीम

छत्तीसगडमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने केंद्र सरकारने चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात केंद्राने हायलेव्हल टीम पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. ही टीम परिस्थितीचा आढावा घेऊन उपाययोजना सूचवणार आहे. राज्यात कोरोनाचे एकूण 7 हजार नवे रुग्ण सापडले आहेत. राज्यात दुर्ग आणि राजनांदगावमध्ये लॉकाडाऊन करण्यात आला आहे, तर रायपूरमध्ये नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे.

राजस्थानात 14 दिवसांची संचारबंदी

राजस्थानच्या जोधपूरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. राज्य सरकारने राजस्थानात 14 दिवसांची म्हणजे 6 ते 19 एप्रिलपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ही संचारबंदी रात्री 8 वाजल्यापासून ते पहाटे 6 वाजेपर्यंत असणार आहे.

हिमाचलमध्ये उद्या निर्णय

हिमाचल प्रदेशातही कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने हिमाचलमध्ये लॉकडाऊन लागू करायचा की रात्रीची संचारबंदी याबाबत उद्या निर्णय घेतला जाणार आहे. हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांची उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बैठक होणार आहे. त्यानंतर संचारबंदीबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे.

चंदीगडमध्ये संचारबंदी

चंदीगडमध्ये कोरोनाचा कहर वाढला आहे. त्यामुळे चंदीगडमध्ये आज बुधवारपासूनच नाईट कर्फ्यू लागू होणार आहे. रात्री 10 वाजल्यापासून ते पहाटे 5 वाजेपर्यंत ही संचारबंदी असणार आहे. चंदीगडचे प्रशासक व्ही.पी. सिंह बदनोर यांनी नाईट कर्फ्यूचे सक्तीने पालन करण्याचे आदेश दिले आहेत. (Complete List of Cities Under Partial Coronavirus Lockdown, Night Curfews)

ओडिशात 10 जिल्ह्यात नाईट कर्फ्यू

ओडिशात सोमवारी कोरोनाचे 573 रुग्ण सापडले आहेत. त्यानंतर ओडिशाच्या 10 जिल्ह्यात नाईट कर्फ्यू लागू करण्यात आली आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या 3 लाखांवर गेली आहे. सुंदरगड, बरगड, झारसुगुडा, संबळपूर, नौपाडा, बलांगीर, कालाहांडी, मल्कानगिरी, कोराटपूर आणि नवरंगपूर जिल्ह्यात रात्री 10 वाजल्यापासून ते पहाटे 5 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू असणार आहे. (Complete List of Cities Under Partial Coronavirus Lockdown, Night Curfews)

योगी सरकारला कोर्टाचे आदेश

उत्तर प्रदेशातही कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. त्यावर अलहाबाद उच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे. कोर्टाने नाईट कर्फ्यू लागू करण्यासारखे उपाय अवलंबण्याचे आदेश राज्यातील योगी आदित्यनाथ सरकारला दिले आहेत. (Complete List of Cities Under Partial Coronavirus Lockdown, Night Curfews)

 

संबंधित बातम्या:

जळगावात कोरोना रुग्णांचा उपचारातील दुर्लक्षाने मृत्यू, राज्यपालांना पत्र लिहित कुटुंबियांचे गंभीर आरोप

कोरोनाची लस सर्वांना सरसकट मिळणार का?; केंद्र सरकारने दिले ‘हे’ उत्तर

“वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या इंटर्नशिपवर निर्णय, मात्र प्रशिक्षित डॉक्टरांवर निर्णय कधी?”

(Complete List of Cities Under Partial Coronavirus Lockdown, Night Curfews)