Fast Food Side Effects : जंक फूड बनतंय हृदय आणि मेंदूचा शत्रू ; ‘या’ आजारांचाही धोका !

| Updated on: Aug 12, 2022 | 3:19 PM

बरेच लोक आवडीने पिझ्झा आणि बर्गर खाताना दिसतात. मात्र हे जंक फूड आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे. जंक फूडच्या अति सेवनामुळे मधुमेह तसेच हृदयविकाराचा धोका वाढतो. जाणून घ्या..

Fast Food Side Effects : जंक फूड बनतंय हृदय आणि मेंदूचा शत्रू ; या आजारांचाही धोका !
Fast Food Side Effects
Image Credit source: social
Follow us on

मुंबई : आजच्या काळात बऱ्याच लोकांचे बाहेरचे अन्न खाण्याचे प्रमाण वाढले आहे. प्रत्येक गल्लीत, रस्त्यावर जागोजागी रेस्टॉरंट्स किंवा फास्ट फूड जॉईंट्स दिसतात. याच फास्ट फूडला जंक फूड (Fast food or Junk food)असेही म्हटले जाते. पिझ्झा, बर्ग, पॅटीस, पेस्ट्री, कुकीज, मोमोज, चाऊमीन आणि अशा अनेक पदार्थांचा जंक फूडमध्ये समावेश होतो. तर सोडा, कोल्ड्रिंक, एनर्जी ड्रिंक यांनाही जंक फूड किंवा ड्रिंक म्हटले जाते. चटपटीत चव असणाऱ्या या पदार्थांची लोकप्रियता दिवसेंदिवस (gaining popularity) वाढतच चालली आहे. हे पदार्थ एकदा, कधीतरी खाणं ठीक असतं. मात्र तुम्हाला त्याची सवय लागली असेल, तुम्ही या पदार्थांचे नियमितपणे सेवन करत असल्यास तब्येतीच्या आणि आरोग्याच्या (side effects on health) दृष्टीने ते अतिशय घातक असते.

फास्ट फूड आरोग्यासाठी का धोकादायक ?

हेल्थलाइनच्या अहवालानुसार, फास्ट फूड अथवा जंक फूडमध्ये कॅलरीज आणि अतिरिक्त साखर खूप जास्त प्रमाणात असते आणि पौष्टिक तत्व नगण्य असतात. फास्ट फूडमध्ये ट्रान्स फॅट असतात, जे शरीरासाठी नुकसानकारक असतात. जास्त फॅट, साखर आणि अतिरिक्त मीठ या कॉम्बिनेशनमुळे फास्ट फूड चविष्ट तर बनते. पण ते खाल्यामुळे आपल्या शरीराच्या कार्यक्षमतेवर वाईट परिणाम होतो. या तीन पदार्थांमुळे कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टिमवर दबाव पडतो आणि लोकं आजारी पडतात. पावसाळ्याच्या दिवसांत स्वच्छतेची नीट काळजी न घेतल्यास फास्ट फूडमुळे टायफॉइड,कॉलरा आणि कावीळीसारखे आजारही पसरू शकतात.

या आजारांचा वाढतो धोका –

अनेक अभ्यासांमधून हे निष्कर्ष निघाले आहेत की, फास्ट फूडमधील ट्रान्स फॅटमुळे रक्तातील बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते आणि गुड कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. यामुळे टाईप 2 मधुमेह
आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. आहारात मीठाचे प्रमाण वाढल्यामुळे उच्च रक्तदाबाचा त्रासही होऊ शकतो. फास्ट फूड अथवा जंक फूडमध्ये कॅलरीजचे प्रमाणही जास्त असते, ज्यामुळे लोकांचे वजन वाढते आणि त्यांना जाडेपणाची समस्या भेडसावते. त्यामुळे अस्थमा आणि श्वसनासंबंधित इतर आजार होण्याचा धोकाही वाढतो..

हे सुद्धा वाचा

मेंदूवरही होतो गंभीर परिणाम –

फास्ट फूड खाल्यामुळे तुमची भूक काही काळासाठी भागते. मात्र बराच काळ फास्ट फूडचे सेवन करणे धोकादायक असते. ज्या व्यक्ती फास्ट फूड आणि प्रोसेस्ड पेस्ट्री खातात, त्यांना डिप्रेशनचा त्रास होण्याची शक्यता इतरांपेक्षा 51 टक्के अधिक असते. जंक फूडमधील हानिकारक घटकांमुळे तुमच्या प्रजनन क्षमतेवरही परिणाम होऊ शकतो. तर नुकत्याच जाहीर झालेल्या एका अभ्यासातून अशी माहिती समोर आली आहे की, फास्ट फूडमधील रसायनांमुळे शरीरारीतल हार्मोन्सच्या कार्यक्षमतेवर गंभीर परिणाम होतो आणि पुनरुत्पादन क्षमता कमी होते. फास्ट फूडच्या सेवनामुळे मेंदूवरही परिणाम होऊ शकतो.

(टीप- या आर्टिकलमध्ये सुचवण्यात आलेले उपाय व दिलेले सल्ले हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. )