मनसेच्या पदाधिकाऱ्यावर भाजपच्या कार्यकर्त्यांच्या हल्ला; जबरदस्तीने माफीचा व्हिडीओही काढला
उरणमध्ये मनसे वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष सतीश पाटील आणि त्यांच्या आईवर भाजप पदाधिकाऱ्यांकडून भ्याड हल्ला झाल्याचा धक्कादायक आरोप होत आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात दोन्ही पक्षांनी एकमेकांवर आरोप केले आहेत.

रायगडच्या उरणमध्ये मनसे वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष सतीश पाटील आणि त्यांच्या आईला भाजप पदाधिकाऱ्यांनी मारहाण केल्याचा आरोप सतीश पाटील यांच्या आईने केला आहे. विशेष म्हणजे या भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी सतीश पाटील यांचा माफीचा व्हिडीओ देखील प्रसारित केला आहे. मनसेचे सतीश पाटील यांनी सोशल मीडियावरुन “उरणमधील मारवाडी लॉबीमुळे भूमिपुत्रांना न्याय मिळत नाही; म्हणूनच उरण नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भूमिपुत्रांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना साथ द्यावी” असे आवाहन केले होते.त्यामुळे हा हल्ला झाल्याचा आरोप होत आहे.
माफी मागण्याचा व्हिडीओ रेकॉर्ड
दत्तजयंतीच्या दिवशी द्रोणागिरी बाजारात मनसे वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष सतीश पाटील यांना अडवून धक्काबुक्की करण्यात आली. दगड दाखवत धमकी देण्यात आली की “ आमदारांच्या माफी मागा” अशी सक्ती करण्यात आली. तसेच सतीश पाटील यांच्याकडून जबरदस्ती माफी मागण्याचा व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आला.
आईने हस्तक्षेप केला
हे भांडण सोडवण्यासाठी सतीश पाटील यांच्या आईने हस्तक्षेप केला असता. त्यांनाही ढकलून अपमानास्पद शब्द वापरल्याचा आरोप होत आहे.सगळ्यात धक्कादायक म्हणजे भाजप पदाधिकाऱ्यांनी जबरदस्तीने पाटील यांच्याकडून माफी मागण्याचा व्हिडिओ देखील रेकॉर्ड करून घेतल्याचे पुढे आले आहे. आश्चर्य म्हणजे, या संपूर्ण घटनेवर अद्याप उरण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नाही.
घाणेरडे आरोप करणाऱ्यांना शिक्षा द्या
भांडणाच्या वेळी सतीश पाटील यांना वाचवण्यासाठी पुढे आलेल्या सतीश पाटील यांच्या आई आशा पाटील यांनाही शिवीगाळ करण्यात आली आहे. त्या म्हणाल्या की “सतीशला धक्काबुक्की करत होते, तेव्हा मी त्याला सोडवायला गेले. तेव्हा भाजपचे नगरसेवक पदाचे उमेदवार गणेश पाटील यांनी माझ्यावर इतके घाणेरडे आणि चारित्र्यावर घाव करणारे शब्द वापरले की मला ते सहनच झाले नाहीत. माझ्या चरित्रावर बोलणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे.
