Ashes 2025 : ऑस्ट्रेलिया मजबूत तर इंग्लंडवर पराभवाचं सावट, दुसऱ्या डावात अशी आहे स्थिती
एशेज कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात इंग्लंड पराभवाच्या सावलीत आहे. कारण दुसऱ्या डावात पहिल्या धावांनी आघाडी मोडून काढताना निम्मा संघ तंबूत परतला आहे. त्यामुळे चौथ्या दिवशीच या सामन्याचा निकाल लागेल असं चित्र आहे.

एशेज कसोटी मालिकेत इंग्लंडची स्थिती नाजूक आहे. पहिला कसोटी सामना गमावल्यानंतर दुसर्या कसोटी सामन्यात कमबॅकचं आव्हान होतं. पिंक बॉल कसोटीत इंग्लंड कमबॅक करेल अशी स्थितीही होती. पहिल्या डावात 334 धावा केल्याने हा सामना इंग्लंड जिंकणार असं वाटलं होतं. पण चिवट खेळी करणाऱ्या कांगारूंनी बाउन्स बॅक केलं. इंग्लंडने दिलेल्या 334 धावांचं आव्हान सहज गाठलं. वरून अधिकच्या धावाही केल्या. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 511 धावांवर आटोपला. म्हणजेच ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 177 धावांची आघाडी घेतली. ही आघाडी मोडून काढताना इंग्लंडच्या संघाने नांगी टाकली. दुसऱ्या डावात इंग्लंडची स्थिती 6 गडी बाद 134 आहे. अजूनही इंग्लंडचा संघ पहिल्या डावातील आघाडी मोडून काढताना 43 धावांनी पिछाडीवर आहे. दिग्गज फलंदाज तंबूत असल्याने ऑस्ट्रेलियासमोर मोठं आव्हान देणं कठीण दिसत आहे.
ऑस्ट्रेलियाची दुसऱ्या डावात 177 धावांची आघाडी मोडून काढण्यासाठी झॅक क्राउली आणि बेन डकेट ही जोडी मैदानात आली होती. पहिल्या विकेटसाठी 48 धावांची भागीदारी केली. डकेट 15 धावा करून बाद झाला. त्यानंतर झॅक क्राउली आणि ओली पोपची जोडी जमली. या जोडीने 42 धावांची भागीदारी केली. ही जोडी फुटली आणि इंग्लंडचा डाव पत्त्यासारखा कोसळला. झॅक क्राऊली 44 धावा करून तंबूत परतला. ओली पोपही काही खास करू शकला नाही. त्याने 26 धावा केल्या आणि तंबूत परतला. पहिल्या डावात शतकी खेळी करणारा जो रूटही स्वस्तात बाद झाला. जो रूट अवघ्या 15 धावांवर बाद झाला. हॅरी ब्रूक 15 आणि जेमी स्मिथही 4 धावा करून बाद झाला.
तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा बेन स्टोक्स नाबाद 4, तर विल जॅक्स नाबाद 4 धावांवर खेळत आहे. आता इंग्लंडच्या हातात 4 विकेट असून कमबॅकचं आव्हान आहे. सध्याची स्थिती पाहता इंग्लंडचा संघ कमबॅक करणं कठीण दिसत आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाचा संघ उर्वरित 4 खेळाडू झटपट बाद करण्याच प्रयत्न करेल. आतापर्यंत मिचेल स्टार्कने 2, मायकल नेसरने 2 आणि स्कॉट बोलँडने 2 गडी बाद केले आहेत.
ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकला तर विजयी टक्केवारी 100 राहील आणि अव्वल स्थान कायम राहील. तर इंग्लंडचा पाय आणखी खोलात जाणार आहे. इंग्लंडचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात येईल असं दिसत आहे.
