खुर्चीवर बसलेला तो धाडकन कोसळला, अवघ्या काही क्षणांत गेला जीव

| Updated on: Dec 29, 2023 | 2:27 PM

एका तरूणाचा खुर्चीत बसल्या बसल्या मृत्यू झाला. या खळबळजनक घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. तेथे उपस्थित काही लोकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्नही केला. पण तोपर्यंत खूप उशीर झाला.

खुर्चीवर बसलेला तो धाडकन कोसळला, अवघ्या काही क्षणांत गेला जीव
Follow us on

इंदोर | 29 डिसेंबर 2023 : देशभरात आकस्मिक मृत्यूंचा आलेख सातत्याने वाढत आहे. इंदूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली. तेथे एका तरूणाचा खुर्चीत बसल्या बसल्या मृत्यू झाला. या खळबळजनक घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. खुर्चीवर बसून तो जमिनीवर कसा पडला हे फुटेजमध्ये दिसत आहे. तेथे उपस्थित काही लोकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्नही केला. पण तोपर्यंत खूप उशीर झाला. त्या सर्वांच्या डोळ्यादेखतच त्या तरूणाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर या अकस्मात होणाऱ्या मृत्यूंची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

खुर्चीत बसल्या बसल्या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना इंदूरच्या चंदन नगर पोलीस स्टेशन परिसरातली आहे. चंदननगर पोलीस ठाणे हद्दीतील एका बांधकामाधीन इमारतीत रंगाचे काम सुरू होते. आशिष सिंग याच्याशिवाय इतर अनेक मजूर तिथे रंगकाम करत होते. दरम्यान, आशिष सिंह तिथे उपस्थित असलेल्या खुर्चीवर बसला. मात्र थोडावेळ बसल्यावर तो अचानक तिथेच खाली पडला. हा सगळा प्रकार तेथे उपस्थित असलेल्या इतर तीन ते चार मजुरांना समजताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

तरूणाला आला सायलेंट हार्ट ॲटॅक

त्याच्या इतर सहकारी मजुरांनी त्याला उचलण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत बराच उशीर झाल्याने तो जागीच बेशुद्ध झाला. यानंतर त्या मजुरांनी आशिषला जवळच्या खासगी रुग्णालयात नेले. पण तेथे तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या तरुणाला सायलेंट हार्ट ॲटॅक आल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला, त्यामुळेचे त्याचा मृत्यू झाला.

पोस्टमॉर्टमसाठी पाठवला मृतदेह

पण या तरूणाच्या अकस्मात मृत्यमुळे त्याचे कुटुंबीय बरेच हादरले आहेत. त्याच्या मृत्यूबाबत नातेवाईकांच्या मनात अनेक शंका आहेत. या संपूर्ण प्रकरणाची माहिती कुटुंबीयांनी चंदननगर पोलिसांना दिली. त्यानंतर चंदननगर पोलिसांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी इंदूरच्या जिल्हा रुग्णालयात पाठवला. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. हृदयविकाराच्या झटक्याने तरुणाचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

इंदूरमध्ये यापूर्वीही अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. अवघ्या काही दिवसांपूर्वीच इंदूरमध्ये एका हॉटेलमध्ये जेवायला गेलेल्या एका मध्यमवयीन व्यक्तीचा हार्ट ॲटॅकमुळे मृत्यू झाला होता. तर एका तरूणाचा ट्रेनच्या प्रवासातच हार्ट ॲटॅक आल्याने मृत्यू झाला. मात्र त्याच्या सहप्रवाशांना बराच वेळ या गोष्टीची कल्पनाही आली नाही.