आहारात कमी कॅलरीज्‌ घ्या अन्‌ दीर्घायुषी व्हा… काय सांगतो अभ्यास

| Updated on: Feb 28, 2022 | 1:35 PM

आहार व दीर्घायुष्याबद्दल नुकताच एक अभ्यास समोर आला आहे. आहारातील कॅलरीजचे प्रमाण कमी केल्यास व्यक्ती जास्त काळ जगू शकतो, असा दावा या अभ्यासात केला आहे. कॅलरीजचे सेवन कमी केल्याने, थायमस ग्रंथी चांगले कार्य करतात. ज्यामुळे जास्त काळ जगण्याची शक्यता वाढते.

आहारात कमी कॅलरीज्‌ घ्या अन्‌ दीर्घायुषी व्हा... काय सांगतो अभ्यास
ओट्समध्ये प्रथिने आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. फायबर पचायला वेळ लागतो. त्यामुळे पोट बराच काळ भरलेले राहते.
Follow us on

आपण रोजच्या जीवनात कुठला आहार घेतो, याला अत्यंत महत्व असते. आपला आहारविहारच आपल्या निरोगी जीवनशैलीचे प्रतीक असते. त्यामुळे आपल्या आहाराला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. असे म्हटले जाते की, पूर्वी अन्नात भेसळ नसल्याने लोकांचे आयुर्मानदेखील (Longevity) वाढते होते. पूर्वी सहज पध्दतीने लोक वयाची शंभरी पार करीत होते. त्यांच्या खानपान पध्दतीदेखील चांगल्या होत्या. शरीराला आवश्‍यक तेव्हढाच व सकस आहाराचा समावेश ते करत असत. आता मात्र तसे राहिले नाही. वाढते प्रदूषण, अन्नातील भेसळ, बदलती जीवनशैली, (Lifestyle) चुकीच्या खानपान पध्दती आदींमुळे मानसाचे आयुर्मान कमी झाले आहे. त्यामुळे आपण काय खातो आणि किती खातो हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार जे लोक कमी अन्न खातात ते जास्त काळ जगतात असा दावा केला गेला आहे. येल युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की कॅलरीजचे सेवन कमी केल्याने (Low calorie food) तुमची रोगप्रतिकारक शक्ती पुन्हा जिवंत होऊ शकते.

अभ्यासात असे आढळून आले, की जे तरुण 14 टक्के कमी कॅलरी ग्रहन करतात, त्यांची थायमस ग्रंथी अधिक चांगले काम करत होती. थायमस ग्रंथी हृदयाच्या वर असते आणि रोगाशी लढणाऱ्या टी-पेशी निर्माण करते. या ग्रंथीतून ‘थायमोसिन’ नावाचा हार्मोन स्त्रवतो.
थायमस ग्रंथी गायब झाल्यामुळेच मानवामध्ये वृद्धत्व येते. मुलांमध्ये ही ग्रंथी मोठी असते. या संशोधनात सहभागी असलेले आहारतज्ञ विश्वदीप दीक्षित म्हणाले, की दीर्घायुष्यासाठी ही ग्रंथी नष्ट होण्यापासून बचाव केला पाहिजे. संशोधकांचे मत आहे की, कॅलरीज्‌चे प्रमाण कमी केल्याने शरीरातील जळजळही कमी होऊ शकते.

काय सांगतो अभ्यास?

‘सायन्स’मध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात 26 ते 47 वयोगटातील 238 दुबळ्या लोकांचा समावेश होता
आणि यापैकी दोन तृतीयांश लोकांना त्यांच्या कॅलरीजचे सेवन कमी करण्यास सांगितले होते. या अभ्यासात सामील असलेल्या लोकांचे दैनंदिन शरीराचे वजनदेखील मोजले गेले. जेव्हा संशोधकांनी दोन वर्षांनंतर या सर्व लोकांचे एमआरआय स्कॅन केले तेव्हा ज्यांनी आपल्या आहारात कमी कॅलरीज घेतल्या आहेत, त्यांच्यामध्ये थायमस ग्रंथी अधिक चांगले काम करत असल्याचे आढळून आले.

संशोधकांनी थायमस ग्रंथीभोवती असलेल्या टी-पेशींची संख्या तसेच चरबीची पातळीदेखील तपासली. संशोधकांना असेही आढळले, की जे लोक आहारात कमी कॅलरी घेतात, त्यांच्या थायमस ग्रंथीभोवती चरबीची उपस्थिती सामान्य आहार घेणाऱ्यांच्या तुलनेत कमी असल्याचे आढळून आले. ज्येष्ठ लेखक व येल सेंटर फॉर रिसर्च ऑन एजिंगचे संचालक प्रा. दीक्षित म्हणाले की, दोन वर्षांपासून कमी कॅलरी घेणार्‍या लोकांमध्ये टी-सेलची निर्मिती अधिक होत असते. त्यामुळे मानवी आयुर्मान वाढत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

Low calorie food can increase the lifespan of a person