Fertility Diet : तुम्हाला वाढवायची आहे प्रजनन क्षमता ? मग जरूर खा ‘या’ गोष्टी…
चुकीची जीवनशैली आणि अस्वास्थ्यकर आहार यामुळे महिला आणि पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर वाईट परिणाम होतो. अशा परिस्थितीत, प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी आहारात अनेक प्रकारचे सुपरफूड समाविष्ट करता येऊ शकते.

नवी दिल्ली – सुपरफूडमध्ये (superfood) हाय प्रोटीन्स, अँटी-ऑक्सिडंट्स, फायबर आणि फॅटी ॲसिड असतात. यामध्ये सॅल्मन, ब्रोकोली आणि ब्लूबेरीसारख्या पदार्थांचा समावेश आहे. संतुलित आहारासाठी, आपण आहारात अनेक प्रकारच्या भाज्या (vegetables) , फळे, लीन मीट आणि संपूर्ण धान्य यांचा समावेश करू शकतो. त्याच वेळी, प्रजनन सल्लागार हे पुरुष आणि स्त्रियांना त्यांची प्रजनन क्षमता (fertility) वाढवण्यासाठी त्यांच्या आहारात विशिष्ट सुपरफूड समाविष्ट करण्याचा सल्ला देतात.
तज्ञ नेहमी संतुलित आहार घेण्याची शिफारस करतात. हे पदार्थ खाल्ल्याने महिलांची गर्भधारणा शक्ती तर वाढतेच पण पुरुषांच्या स्पर्मची (शुक्राणूंची) संख्या आणि गुणवत्ता सुधारण्यासही मदत होते. संतुलित आहारामध्ये भरपूर जीवनसत्त्वे आणि पोषक तत्वं असतात. निरोगी जीवनशैली पुरुष आणि स्त्रियांची प्रजनन क्षमता वाढवण्यास मदत करते. आपण आहारात कोणत्या सुपरफूडचा समावेश करू शकता, ते जाणून घेऊया.
हिरव्या पालेभाज्या
हिरव्या पालेभाज्यांमध्ये व्हिटॅमिन सी आणि फॉलिक ॲसिड असते. हे ओव्ह्युलेशनमध्ये मदत करते. या भाज्या खाल्ल्याने गर्भपात होण्याची शक्यता कमी होते. पालक, ब्रोकोली, केल आणि मेथीचा आहारात समावेश केल्यास स्पर्मची (शुक्राणूंची) गुणवत्ता सुधारते. म्हणूनच प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी स्त्री-पुरुषांनी हिरव्या पालेभाज्या खाव्यात.
ड्रायफ्रुट्स
ड्रायफ्रुट्समध्ये भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे आणि प्रथिने असतात. अक्रोडमध्ये सेलेनिअम असते. त्यामुळे प्रजनन क्षमता वाढण्यास मदत होते. हे फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण करण्यास देखील मदत करते. दररोज ड्रायफ्रुट्सचे सेवन आवर्जून करा.
टोमॅटो
टोमॅटोमध्ये लायकोपीन असते. एका अभ्यासानुसार, हे (लायकोपीन) पुरूषांच्या स्पर्मची गुणवत्ता आणि संख्या वाढवण्याचे काम करते.
ब्रोकोली
ब्रोकोली हे सुपरफूड आहे. जर तुम्ही बाळासाठी प्लॅनिंग करत असाल तर तुमच्या आहारात ब्रोकोलीचा समावेश करणे आवश्यक आहे. त्यात फॉलिक ॲसिड असते. निरोगी गर्भधारणेसाठी हे खूप महत्वाचे आहे. तसेच ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन सी असते, यामुळे प्रजनन क्षमता वाढते.
ॲव्होकॅडो
ॲव्होकॅडोमध्ये व्हिटॅमिन ई असते. हे स्पर्मची गुणवत्ता सुधारते. म्हणूनच सॅलॅड किंवा स्मूदीच्या रूपातही ॲव्हाकॅडोचा आहारात समावेश केला जाऊ शकतो.
भोपळ्याच्या बिया
भोपळ्याच्या बियांमध्ये झिंक असते. महिला आणि पुरुषांची प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी हे खूप फायदेशीर आहे. भोपळ्याच्या बियांमध्ये झिंक मुबलक प्रमाणात असते. याशिवाय तुम्ही ओट्स आणि मटार इत्यादी पदार्थांचा आहारात समावेश करू शकता.
