Turmeric Water : पावसाळ्यात हळदीचे पाणी पिऊन करा दिवसाची सुरूवात, वाढेल रोगप्रतिकारक शक्ती

| Updated on: Jul 29, 2022 | 5:08 PM

आयुर्वेदात हळद ही अतिशय औषधी गुणधर्म असलेली मानतात. प्रत्येक घरांत हळद असतेच. स्वयंपाकात, तसेच सौंदर्य प्रसाधन म्हणून इतकंच नाही तर काही लागलं, खरचटून रक्त वगैरे आलं तरी उपचारांसाठी सर्वप्रथम हळदच लावली जाते.

Turmeric Water : पावसाळ्यात हळदीचे पाणी पिऊन करा दिवसाची सुरूवात, वाढेल रोगप्रतिकारक शक्ती
Follow us on

Turmeric Water Benefits : हळद (Turmeric)ही एक अशी गोष्ट आहे, जी प्रत्येक घरात उपलब्ध असतेच. आयुर्वेदात हळदीला औषधी गुणधर्मांचा खजिना संबोधले जाते. स्वयंपाकात, तसेच सौंदर्य प्रसाधन म्हणून इतकंच नाही तर काही लागलं, खरचटून रक्त वगैरे आलं तरी उपचारांसाठी (Treatment) सर्वप्रथम हळदच लावली जाते. हळदीमध्ये ॲंटी-व्हायरल, ॲंटी-ऑक्सीडेंट आणि ॲंटी-फंगल गुणधर्म असतात, जे शरीराचा अनेक आजारांपासून बचाव करतात. पावसाळ्यात बऱ्याच वेळेस आपली पचनशक्ती, रोगप्रतिकारक शक्ती (Immunity) कमी होते आणि आजारी पडण्याचे प्रमाण वाढते. सर्दी, खोकला, ताप या सारखे आजार सहज होतात. मात्र यापासून वाचायचे असेल तर रोजच्या आहारात हळदीचे सेवन केले पाहिजे. हळदीचे पाणी (Turmeric water) प्यायल्यानेही शरीराला बरेच फायदे (Benefits) मिळतात.

रोगप्रतिकारक शक्ती वाढते –

शरीराला आजारांपासून रोखायचे असेल तर रोगप्रतिकारक क्षमता चांगली असावी लागते. हळदीमध्ये असलेला करक्यूमिन हा घटक रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतो. रोज सकाळी उठल्यानंतर हळदीचे पाणी प्यायल्यास त्याचा मोठा फायदा दिसून येईल. आणि सर्दी, खोकला, ताप यासारखे ऋतूमानानुसार होणाऱ्या आजारांपासून शरीराचा बचाव होईल. काही संशोधनातून समोर आलेल्या माहितीनुसार, करक्यूमिन तत्वामुळे डेंग्यू, हेपिटायटिस बी आणि झिका व्हायरस सारख्या अनेक आजांरापासूनही संरक्षण मिळते.

त्वचेसाठीही फायदेशीर –

त्वचेसाठी वापरण्यात येणाऱ्या सौंदर्यप्रसाधनामध्ये हळदीचा वापर केला जातो. बऱ्याच घरांत दूध-बेसन-हळदीचा लेप चेहऱ्यावर लावतात. हळदीमधीलल पोषक तत्वांमुळे तुमच्या त्वचेचा रंग तर निखरतोच पण पोतही सुधारतो. बाहेरून लावण्याप्रमाणेच पोटातूनही हळदीचे सेवन केल्यास फायदा होता. रोज सकाळी हळदीचे पाणी प्यायल्यास, रक्त शुद्ध होते. त्यामुळे त्वचा तर चमकतेच पण मुरुमे, फोड यांची समस्याही कमी होते.

कॅन्सर आणि अल्झायमर सारख्या आजारांपासून वाचवते –

काही अभ्यासानुसार, हळदीतील करक्यूमिन तत्व हे शक्तिशाली असते. त्यामध्ये ॲंटी-ट्युमर गुणधर्म असतात, जे ट्युमरची वाढ थोपवतात आणि कॅन्सर सेल्सची वाढ होण्यापासून रोखतात. त्यासह ते अल्झायमर सारख्या आजारालाही रोखण्यात मदत करतात. रोज हळदीचे पाणी प्यायल्यास शरीराचा कॅन्सर आणि अल्झायमर सारख्या आजारांपासून बचाव होतो.

वजन कमी करण्यास फायदेशीर

वजन कमी करायचे असेल तर हळद फार उपयोगी ठरते. रोज सकाळी उठल्यानंतर हळदीचे पाणी प्यायल्यास, मेटाबॉलिज्म वाढते. तुमचे मेटाबॉलिज्म जितक्या वेगाने काम करते, तितक्या वेगाने तुमच्या शरीरातील चरबी कमी होते व वजन कमी होण्यास मदत होते.

कसे तयार करावे हळदीचे पाणी?

एक ग्लास पाण्यात हळकुंडाचा छोटा टाकावा व ते पाणी चांगले उकळावे. पाणी कोमट झाल्यावर अंशपोटी प्यावे. जर तुम्हाला हळद पावडर वापरायची असेल तर एक ग्लास पाण्यात पाव चमचा हळद पावडर घालून ते पाणी प्यावे. हे पाणी प्यायल्यानंतर अर्धा ते एक तास इतर कोणताही पदार्थ खाऊ नये. नियमितपणे हळदीचे पाणी सेवन केल्यास त्याचा अपेक्षित फायदा दिसून येईल.

( टीप- या आर्टिकलमध्ये सुचवण्यात आलेले उपाय व दिलेले सल्ले हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. ते अवलंबण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. )