Salt intake tips: ‘या’ उपायांनी आहारातील मीठाचा वापर करा कमी
रोजच्या जेवणात मीठाचा वापर अनिवार्य आहे, अन्यथा जेवण अळणी होईल. मात्र मीठाचे अतिसेवन केल्यास बरेच नुकसानही होऊ शकते. आहारात मीठाचा वापर कमी करण्यासाठी काही उपाय करता येऊ शकतात.

नवी दिल्ली – मीठ (Salt) हा आपल्या आयुष्यातील आणि जेवणातील अविभाज्य घटक आहे. रोजच्या जेवणात मीठाचा वापर अनिवार्य आहे, अन्यथा जेवण अळणी होतं. एवढंच नव्हे तर आजकाल दात घासण्याच्या पेस्टमध्येही मीठ असते. तात्पर्य काय, तर मीठाशिवाय आपलं पानही हलू शकत नाही. जेवणाची चव (to improve taste) वाढवण्यासाठी मीठाचा वापर (use of salt) केला जातो, तसेच हे मीठ आपली मज्जासंस्था, स्नायूंचे कार्य, शरीरातील पाणी आणि मिनरल्स यांची पातळी संतुलित राखण्याचेही काम करते.
पण याच मीठाचे प्रमाण वाढल्यास किंवा त्याचे अतिसेवन केल्यास त्यामुळे स्ट्रोक, हृदयविकार तसेच कॅल्शिअम कमी होणे, यासारख्य समस्या उद्भवू शकतात. आपल्यापैकी बरेचसे लोक रोजच्या जेवणाव्यतिरिक्त फरसाण, नमकीन, कुकीज, सँडविच किंवा सूप या सारख्या पदार्थांद्वारे मीठाचे सेवन करतात. ही आपली रोजची सवय शरीरासाठी घातक ठरू शकते. मीठाचे अतिरिक्त प्रमाणात सेवन केल्यास ताण वाढू शकतो, तसेच आरोग्याच्या इतर समस्याही उद्भवू शकतात. त्यामुळे रोजच्या जीवनात मीठाचा वापर कमी कसा करता येईल, हे जाणून घेऊया.
पॅकबंद पदार्थांचे सेवन टाळा
प्रिझर्व्हेटिव्ह घातलेले किंवा पॅकबंद असलेल्या पदार्थांचे सेवन करू नये, असा सल्ला आरोग्य तज्ज्ञ देतात. अशा पदार्थांमध्ये सोडियम असते. त्यामुळे तुम्ही नो सॉल्ट म्हणजेच मीठ नसलेले पदार्थ खाण्यास प्राधान्य द्यावे. प्रिझर्व्हेटिव्हयुक्त किंवा पॅकबंद पदार्थ नियमितपणे वारंवार खाल्यास कॅल्शिअमची कमतरता निर्माण होते. तसेच काही काळानंतर सांधेदुखीही वाढू शकते.
अन्नात वरून मीठ घालू नका
अनेक संशोधनातून हे समोर आले आहे की, जे लोकं अन्नपदार्थांमध्ये वरतून मीठ घालतात, त्यांना आरोग्याशी संबंधित समस्या लवकरच ग्रासतात. या सवयीमुळे युरिक ॲसिडचे प्रमाणही लक्षणीय वेगाने वाढते. युरिक ॲसिड हे आपल्या शरीरात असते, मात्र त्याची पातळी वाढू लागल्यास सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो.
सी फूड खाणे टाळा
सी-फूडमध्ये मीठाचे प्रमाण अधिक असते. अशा प्रकारच्या पदार्थांचे तुम्ही सेवन करू शकता, मात्र त्याचे अतिसेवन केल्यास शरीरातील मीठाचे प्रमाण वाढू शकते. अती मीठ खाऊन आरोग्यासंदर्भातील समस्या वाढवण्यापेक्षा आजपासूनच मीठाचे कमी सेवन करण्यावर भर देणे योग्य ठरते.
( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)
