Alzheimer Causes: शरीरात ‘या’ व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे वृद्धांमध्ये डिमेंशियाचा धोका

व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे लोकं डिमेंशिया म्हणजेच स्मृतीभ्रंशाचे बळी पडू शकतात, असे एका संशोधनात दिसून आले आहे. जर्मनीमध्ये 1,334 वृद्धांवर करण्यात आलेल्या अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे.

Alzheimer Causes: शरीरात या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे वृद्धांमध्ये डिमेंशियाचा धोका
Image Credit source: Freepik
| Updated on: Jan 11, 2023 | 11:33 AM

नवी दिल्ली – शरीरात व्हिटॅमिन डी (vitamin D deficiency)ची कमतरता असेल तर अनेक आजार होण्याचा धोका असतो. पण आता एका संशोधनात असे दिसून आले आहे की या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे लोक डिमेंशियाचे (dementia) म्हणजेच स्मृतीभ्रंशाचे शिकार होऊ शकतात. जर्मनीमध्ये 1,334 वृद्धांवर केलेल्या अभ्यासात (study reveals) असे दिसून आले आहे की व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे लोकांमध्ये स्मृतिभ्रंश होण्याचा धोका वाढला आहे.

या संशोधनात सहभागी झालेल्या लोकांचे सरासरी वय हे 84 वर्ष होते, ज्यांचा सुमारे 7 वर्ष फॉलोअप घेण्यात आला. या संशोधनात सहभागींपैकी 250 लोकांना अल्झायमर- डिमेंशियाची तक्रार होती तर सुमारे 209 सहभागींना देखील अल्झायमरचा त्रास होता. तर 41लोकांना व्हॅस्क्युलर डिमेंशिया झाला होता. अभ्यासात असे आढळून आले की व्हिटॅमिन डीची कमतरता डिमेंशियाशी संबंधित आहे. जेव्हा जीवनशैली आणि कार्डिओमेटाबॉलिक आरोग्य जोखीम घटकांसारख्या गोंधळात टाकणाऱ्या घटकांसह मॉडेलिंग करण्यात आले असता, व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे वृद्ध लोकांमध्ये स्मृतिभ्रंश होण्याची जोखीम खूप जास्त होती, असे त्यामध्ये आढळून आले.

संशोधनात असे आढळून आले की 25 नॅनोमोल्स प्रति लिटर (nmol/L) पेक्षा कमी व्हिटॅमिन डीचे नमुने असलेल्या लोकांमध्ये इतर लोकांपेक्षा स्मृतिभ्रंशाची अधिक लक्षणे आढळतात. ज्या लोकांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता नव्हती, त्यांचे वय वाढल्यानंतरही अल्झायमर आणि स्मृतिभ्रंशाची लक्षणे खूपच कमी होती.

व्हिटॅमिन डी मेंदूसाठी महत्वाचे

ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करणे, यासारख्या मेंदूच्या अनेक कार्यांमध्ये व्हिटॅमिन डी सामील असते. जास्त साखर, जंक फूड खाणे, धूम्रपान करणे यामुळे तणाव वाढतो. तसेच प्रदूषण आणि कीटकनाशकांसारख्या हानिकारक रसायनांच्या संपर्कात आल्याने व्यक्तीला ऑक्सिडेटिव्ह तणावाचा धोका वाढतो. ऑक्सिडेटिव्ह तणाव अल्झायमर रोगाच्या रोगजनकांमध्ये एक आवश्यक भूमिका बजावू शकतो आणि मेंदूच्या कार्यामध्ये व्हिटॅमिन डी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. मेंदूसोबतच शरीराच्या हाडांसाठीही व्हिटॅमिन डी खूप महत्त्वाचे आहे.

भारतातील लोकांमध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, भारतातील हवामान बहुतेक वेळा उष्ण असते आणि सूर्यप्रकाशही भरपूर असतो, पण असे असूनही 76 टक्के भारतीयांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता आहे. पौष्टिक आहाराचा अभाव, सतत घरात राहणे, त्वचा काळी पडू नये म्हणून हात आणि चेहरा झाकणे यामुळे हे घडते. अशा परिस्थितीत अंगावर सू्र्यप्रकाश किंवा ऊन घेणे महत्वाचे आहे. शरीराच्या कोणत्याही भागावर सूर्यप्रकाश पडणे आवश्यक आहे, अन्यथा व्हिटॅमिन डीची कमतरता निर्माण होऊ शकते.