Side Effects of Drinking Cold Drinks : कोल्डड्रिंकचे अति सेवन कराल तर स्थूल तर व्हालच पण मेमरीही गमवाल
लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनाच शीतपेयाने (कोल्डड्रिंक) भुरळ घातली आहे. उन्हात फिरणे असो किंवा घरात कोणतीही पार्टी असो, शीतपेयांशिवाय मजा येत नाही, असा एक समज झाला आहे. पण हीच शीतपेये आरोग्यसाठी अतिशय घातक आहे. त्याचा परिणाम स्मरणशक्तीवरही होऊ शकतो.

आजकाल सर्वांनाच शीतपेय (Cold drink) पिण्याची सवय लागली आहे. घरी पार्टी असो किंवा चित्रपट बघायचा असो, शीतपेयाशिवाय लोकांना मजाच येत नाही. शीतपेये पिण्याचा ट्रेंड वाढतच चाला आहे. ते प्यायल्यामुळे थोडा वेळ बरं वाटतं, पण आपल्या शरीरावर त्याचे फार वाईट (Health problems) परिणाम होतात. शीतपेयांमधील अतिरिक्त साखरेमुळे (Sugar)अनेक आजार होऊ शकतात. मधुमेह, स्थुलता, दातांचे नुकसान तर होतेच पण याच शीतपेयांमुळे स्मरणशक्तीवरही परिणाम होऊ शकतो. तसेच पोटावरील चरबीही वाढू शकते. हे सर्व आजार हळूहळू बळावत जातात आणि आपल्या आरोग्याच्या समस्या आणखीनच वाढतात. त्यामुळे शीतपेयांच्या या घातक सवयीपासून आपण लांब राहिलेलेच बरे ! शीतपेयांचे दुष्पमरिणाम काय आहेत, ते पाहूया.
मधुमेह
शीतपेयांमध्ये साखरेचे प्रमाण खूपच जास्त असते. त्यामुळे शीतपेयांचे सेवन केल्याने शरीरावर घातक परिणाम होऊन मधुमेहाचा धोका वाढू शकतो. शीत पेयांमुळे शरीरतील साखरेचा अचानक उद्रेक होतो, त्यामुळे शरारीत इन्सुलिनचे प्रमाण पटकन वाढते. इन्सुलिन हार्मोनला सतत त्रास झाल्यास, ते शरीरासाठी घातक ठरू शकते.
स्थुलता
शीतपेयांमध्ये सुक्रोज हे तत्व सापडते, ज्यामुळे फ्रुक्टोज बनतात. ग्लुकोज, सुक्रोज आणि फ्रुक्टोज हे सर्व साखरेशी संबंधित आहे. फ्रुक्टोजमुळे आपल्याला कॅलरीज मिळतात. शीतपेयांमध्ये साखरेचे प्रमाण खूप जास्त असल्याने, ते वजन वाढणे वा स्थुलतेचे प्रमुख कारण बनू शकते. शीतपेयांचे रोज सेवन केल्यास जाडेपणाची समस्या वाढण्याची धोका 60 टक्के वाढतो, असे एका अभ्यासातून समोर आले आहे. त्यामुळे शरीर निरोगी व काटक ठेवायचे असेल, जाडेपणाचा धोका नको असेल, तर शीतपेयांचे सेवन चुकूनही करू नये.
लिव्हर डॅमेजचा धोका
वर नमूद केल्याप्रमाणेच शीतपेयांमध्ये ग्लुकोज आणि फ्रुक्टोजचे प्रमाण खूप असते. या पेयांमध्ये साखरही अतिरिक्त असते, त्यामुळे फ्रुक्टोजचे पचन करण्यासाठी लिव्हरला ( यकृत) खूप मेहनत करावी लागते. ज्यामुळे लिव्हर इन्फ्लेमेशनची समस्या उद्भवू शकते. लिव्हरला धोका पोहोचू शकतो.
दातांचे अपरिमित नुकसान
शीतपेय वा सोडा असलेल्या पेयांमध्ये साखरेप्रमाणेच फॉस्फरिक ॲसिड व कार्बनिक ॲसिडही असते. त्यामुळे आपल्या दातांचे संरक्षक कवच म्हणजे एनॅमलचे नुकसान होते. आपले दात ठिसूळ होऊ शकतात तसेच त्यांना कीडही लागू शकते. ठिसूळ दात लवकर पडू शकतात. त्यामुळे मजबूत दात हवे असतील, तर शीतपेयांकडे दुर्लक्षच करणे चांगले !
स्मरणशक्तीवर होऊ शकतो परिणाम
शीतपेयांमध्ये कॅफेन नावाचा एक गुंगी आणणारा घटक असतो. एका संशोधनानुसार, शीतपेयांच्या सेवनानंतर अवघ्या 5-10 मिनिटांत शरीरातील डोपामाइनची पातळी वाढते. या हार्माोनमुळे आपल्याला थोडा वेळ आनंदी वाटते आणि आपल्या आणखी शीतपेय प्यावेसे वाटते. मात्र हे शरीरासाठी अतिशय घातक असते. त्याचा परिणाम आपल्या मेंदूवरही होऊ शकतो. लहान मुलांनी शीतपेयांचे सेवन केल्यास त्यांच्या मेंदूच्या विकासावर परिणाम होऊ शकतो. काही वेळेस यामुळे स्मरणशक्तीवरही विपरीत परिणाम होतो. लहान मुलांनी शीतपेये प्यायल्यास त्यांची एकाग्रता कमी होते.
त्यामुळेच शीतपेयांचे सेवन टाळलेले कधीही चांगले असते.
