
प्रेमात पडलेल्या तरुण-तरूणी कोणत्या थराला जातील याची कोणतीही सीमा नसते. अशातच आता पाकिस्तानातील प्रेमात आंधळ्या झालेल्या एका 16 वर्षीय जोडप्याने भारतात प्रवेश केल्याचे समोर आले आहे. बुधवारी गुजरातच्या कच्छमधील ढोला वीरा गावाजवळ स्थानिलांना एक मुलगा आणि मुलगी दिसली. त्यानंतर त्यांनी या जोडप्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलीसांची या जोडप्याकडे चौकशी केला तेव्हा असे दिसून आले की, घरच्यांनी लग्नासाठी नकार दिल्यामुळे हे जोडपं पाकिस्तानातून पळून भारतात आले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
प्राथमिक तपासास असे आढळले की, हे दोघेही 16 वर्षांचे आहेत. मात्र त्यांनी नावे समोर आलेली नाहीत. कच्छच्या वाळवंटात तीन दिवस भटकल्यानंतर भारत-पाकिस्तान सीमा ओलांडली. सध्या या जोडप्याची चौकशी सुरु आहे, पोलिसांनी अद्याप त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेला नाही. आता आगामी काळात गुप्तचर विभागासह अनेक भारतीय संस्था त्यांची चौकशी करणार असल्याची माहिती समोर आले आहे.
कच्छचे पोलीस अधीक्षक सागर बागमार यांनी बीबीसी गुजरातीला याबाबत माहिती दिली आहे. बागमार म्हणाले की, या जोडप्याकडे कोणतीही कागदपत्रे आढळली नाहीत. या दोघांनीही ते 16 वर्षांचे असल्याचा दावा केला आहे. हे दोघे भिल्ल समुदायाचे असून पाकिस्तानच्या थारपारकर जिल्ह्यातील एका गावातील रहिवासी आहेत. हे गाव पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेपासून सुमारे 10 किलोमीटर अंतरावर आहे.
पोलिसांच्या चौकशीत या जोडप्याने सांगितले की ते एकमेकांवर प्रेम करतात, मात्र मुलीच्या कुटुंबाला हे नाते मान्य नव्हते. त्यामुळे त्यांच्या लग्नाला नकार मिळाला तेव्हा या दोघांनी गाव सोडून पळून भारतात येण्याचा निर्णय घेतला आणि ते यात यशस्वी झाले. पोलीस अधीक्षक बागमार यांनी पुढे बोलताना सांगितले की, लोक अनेकदा भटकल्यामुळे सीमा ओलांडतात, मात्र या जोडप्याने जाणून बुजून भारतीय सीमेत प्रवेश केला आहे.
पोलीस अधीक्षक सागर बागमार म्हणाले की, हे जोडपे वाळवंट ओलांडून सीमेच्या आत 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या खादीर परिसरात पोहोचले. गाव सोडताना त्यांनी सोबत पाणी आणि अन्न घेतले होते. सीमावर्ती भागात पावसामुळे पाणी भरले होते, त्यामुळे त्यांनी काही अंतर पोहून पार केले. बुधवारी रतनपार गावाच्या बाहेर त्यांना गावकऱ्यांनी पाहिले. ते सिंधी बोलत होते. त्यांनुळे गावकऱ्यांनी त्यांना पोलीसांच्या ताब्यात दिले.
या दोघांनी 1946 च्या फॉरेनर्स अॅक्ट अंतर्गत व्हिसाशिवाय भारतात प्रवेश करण्याचा गुन्हा केला आहे. त्यांना पाच वर्षांपर्यंत तुरुंगवास, पाच लाख रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. कच्छ सीमा ओलांडणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना गुन्हा दाखल होण्यापूर्वी भूजमधील तपास केंद्रात ठेवण्यात येते. न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले तर त्यांना कच्छ किंवा जामनगर तुरुंगात ठेवले जाते आणि त्यांची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर पाकिस्तानने त्यांचे नागरिकत्व स्वीकारल्यानंतर त्यांना पुन्हा पाकिस्तानात पाठवले जाते.