पाकच्या अणवस्त्र कार्यक्रमाचे जनक अब्दुल कादीर खान यांचं निधन; एका रात्रीत ठरलेले हिरो

| Updated on: Oct 10, 2021 | 1:27 PM

पाकिस्तानचे प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ डॉ. अब्दुल कादीर खान (Abdul Qadeer Khan) यांचे रविवारी वयाच्या 85 व्या वर्षी प्रकृती बिघडल्यानं निधन झाले. खान यांना पाकिस्तानच्या अण्वस्त्र कार्यक्रमाचे जनक मानले जाते.

पाकच्या अणवस्त्र कार्यक्रमाचे जनक अब्दुल कादीर खान यांचं निधन; एका रात्रीत ठरलेले हिरो
Dr Abdul Qadeer Khan
Follow us on

लाहोर: पाकिस्तानचे प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ डॉ. अब्दुल कादीर खान (Abdul Qadeer Khan) यांचे रविवारी वयाच्या 85 व्या वर्षी प्रकृती बिघडल्यानं निधन झाले. खान यांना पाकिस्तानच्या अण्वस्त्र कार्यक्रमाचे जनक मानले जाते. पाकिस्तानला मुस्लिम जगातील पहिले अण्वस्त्र संपन्न देश बनवण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. पाकिस्तानी जनता त्याच्याकडे नायक म्हणून पाहते. डॉ.अब्दुल कादीर खान यांची प्रकृती शनिवारी रात्री खालावली. यानंतर, त्यांना रविवारी सकाळी सहा वाजता रुग्णवाहिकेतून रुग्णालयात आणण्यात आले होते.

इस्लामाबदमध्ये होणार दफन

डॉ. अब्दुल खान यांना श्वास घेण्यास त्रास होत होता, त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती खालावत गेली आणि त्यांच्या फुफ्फुसात रक्त साचल्यानं त्यांना श्वास घेण्यास त्रास झाला होता. रुग्णालयातील डॉ. अब्दुल खान यांचे प्राण वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, पण त्यांना यश आले नाही आणि स्थानिक वेळेनुसार सकाळी 7:04 वाजता त्यांचे निधन झाले.

डॉक्टरांनी सांगितले की अब्दुल कादीर यांचा मृत्यू फुफ्फुस निकामी झाल्यानं झाला. पाकिस्तानचे गृहमंत्री शेख रशीद म्हणाले की, डॉ. खान यांचे प्राण वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. मात्र यश आलं नाही. इस्लामाबादमधील स्मशानभूमीत त्यांचे दफन केले जाईल.

भारताच्या भोपाळ शहरात जन्म

मे 1998 मध्ये जेव्हा पाकिस्तानने पहिली अणुचाचणी घेतली तेव्हा डॉ. अब्दुल कादीर खान एका रात्रीत पाकिस्तानी जनतेसाठी राष्ट्रीय हिरो ठरले. आण्विक चाचण्यांनंतर, पाकिस्तान मुस्लिम जगातील एकमेव अणुशक्ती बनला आणि अण्वस्त्रे असणारा सातवा देश बनला. डॉ.खान यांचा जन्म 1936 मध्ये भारताच्या भोपाळ शहरात झाला. पण फाळणीनंतर खान आपल्या कुटुंबासह पाकिस्तानात गेले. डॉ. खान यांनी आपले सुरुवातीचे शिक्षण कराचीच्या डीजे सायन्स कॉलेजमधून घेतले. त्यानंतर 1961 मध्ये ते उच्च शिक्षणासाठी युरोपला गेले आणि जर्मनी आणि हॉलंडमधील विद्यापीठातून पीएच.डी. केली.

इम्रान खानवर दुर्लक्ष केल्याचा आरोप

गेल्या महिन्यात डॉ खान यांनी तब्येत बिघडल्यावर इम्रान खान आणि त्यांच्या कॅबिनेट मंत्र्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप केला होता. पंतप्रधान इम्रान खान किंवा त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यांनी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली नाही. पाकिस्तानच्या अधिकृत असोसिएटेड प्रेसच्या म्हणण्यानुसार, डॉ खान यांना 26 ऑगस्ट रोजी कोरोनाची लागण झाल्यानंतर खान संशोधन प्रयोगशाळा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नंतर नंतर, त्याला रावळपिंडी येथील लष्करी रुग्णालयात हलवण्यात आले. जिथे बरे झाल्यानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला होता.

इतर बातम्या:

मॉल, किराणा शॉप्स रिकामे, कुणाला पेट्रोल, कुणाला किराणा मिळेना, ब्रिटनमध्ये सैनिक ट्रक चालवण्याच्या तयारीत

हाँगकाँगला लायनरॉक चक्रीवादळ धडकलं, 60 किमीच्या वेगाने वादळी वारे आणि मुसळधार पाऊस, महापूराचा इशारा

Abdul Qadeer Khan Father of Pakistan nuclear programme passes away