टॉस जिंकून आधी बॅटिंग करतील… दिल्लीत पोलिसांचा फौजफाटा, पाकिस्तानातून खोडसाळ प्रतिक्रिया
अभिजीत दीपके यांच्या कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) दिल्लीत आंदोलन सुरू आहे. 'एसआयआर' प्रक्रियेतील गडबडींविरोधात जंतरमंतरवर जोरदार निदर्शने झाली. यामुळे दिल्लीत तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करून अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. या सुरक्षा व्यवस्थेवर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरियाने खोचक टोमणा मारला, जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वातील कॉकरोच जनता पार्टीचं दिल्लीत आंदोलन सुरू आहे. जंतरमंतरवर सीजेपीचे कार्यकर्ते जोरदार आंदोलन करत आहेत. त्यामुळे दिल्लीचं वातावरण तापलं आहे. हे आंदोलन रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी तगडा बंदोबस्त केला होता. संसद परिसर, जंतरमंतर आणि निवडणूक आयोगाच्या कार्यालयाच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राज्य राखीव दलाच्या तुकड्या आणि दंगल नियंत्रण पथकही तैनात करण्यात आलं आहे. एवढेच नव्हे तर विमानतळाभोवतीही मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. हा संपूर्ण पोलीस बंदोबस्त पाहून पाकिस्तानातून प्रतिक्रिया आली आहे.
पाकिस्तानचा माजी लेग स्पिनर दानिश कनेरियाने या बंदोबस्तावरून टोला लगावला आहे. त्याचं हे विधान सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. दिल्ली पोलिसांचा तुफान बंदोबस्त पाहून त्याने हा टोला लगावला आहे. दानिश कनेरिया त्याच्या वायफळ विधानासाठी प्रसिद्ध आहे. त्याने आताही तसंच खोडसाळ विधान केलं आहे. मला वाटतं दिल्ली पोलीस आधी टॉस जिंकेल आणि आधी फलंदाजी करण्याचा निर्णय घेईल, असा टोमणा कनेरियाने लगावला आहे.
I hope Delhi Police win the toss and decide to bat first! 🏏
— Danish Kaneria (@DanishKaneria61) October 10, 2026
कनेरियाने क्रिकेटच्या भाषेत हा टोला लगावला आहे. त्याच्या या टोमण्याकडे प्रत्येकाचं ध्यान गेलं आहे. बघता बघता त्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यावर फॅन्सकडून सातत्याने प्रतिक्रिया येत आहे.
मोठा बंदोबस्त
एसआयआर प्रक्रियेत झालेल्या गडबडीच्या विरोधात सीजेपीचे कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. सकाळी दिल्ली पोलिसांनी अभिजीत दीपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांना विमानातच ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे सीजेपी कार्यकर्ते लालबूंद झाले आहेत. या आंदोलकांनी जंतरमंतरवर जोरदार आंदोलन सुरू केलं आहे. त्यातील अनेकांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेण्यात आलं आहे. तर कालपासून दिल्ली पोलिसांनी तब्बल 500 कार्यकर्त्यांची धरपकड केली आहे.
ठिकठिकाणी बंदोबस्त
सीजेपी कार्यकर्त्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत नाक्यानाक्यावर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अनेक ठिकाणी मोठी सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. मंडी हाऊस गोल चक्कर पासून जंतरमंतरपर्यंत पोलीस आणि सुरक्षा दलाचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अनेक रस्ते बंद करण्यात आले आहेत. अनेक ठिकाणची वाहतूक वळवण्यात आली आहे.