
इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरु झाले आहे. दोन्ही देशांकडून हल्ले होत आहेत. इराणने इस्रायलच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देताना अनेक क्षेपणास्त्र डागली. मात्र या बॅलिस्टिक हल्ल्यांमध्ये भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांच्या इस्रायलमधील हैफा बंदरावर कोणताही परिणाम झालेला नाही. बंदरातून मालवाहतूक सुरळीत सुरू आहे.
अदानींच्या बंदरावर हल्ल्याचा कोणताही परिणाम नाही
इस्रायलने तेल अवीव येथील इराणी अणुभट्टी आणि इतर ठिकाणी केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून शनिवारी रात्री उशिरा इराणने इस्रायलच्या हैफा बंदर आणि जवळच्या तेल शुद्धीकरण कारखान्यांवर हल्ले केले. बंदरातील रासायनिक टर्मिनलमध्ये शार्पनेल पडले आणि काही इतर प्रोजेक्टाइल तेल शुद्धीकरण कारखान्यावर पडले. मात्र या हल्ल्यात कोणीही जखमी झाले नाही. तसेच अदानींच्या बंदरावर हल्ल्याचा कोणताही परिणाम झालेला नाही.
बंदराचे कामकाज सुरु
सुत्रांनी झालेल्या माहितीनुसार, हैफा बंदरावर इंटरसेप्टर शार्पनेलचा तुकडा सापडला परंतु कोणतीही दुखापत झाली नाही. या बंदरात सध्या आता आठ जहाजे आहेत, तसेच सध्या बंदरातील मालवाहतूक सुरळीत आहे. इराणी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे बंदराचे किंवा त्याच्या कामकाजाचे कोणतेही नुकसान झाले नाही. मात्र अदानी समूहाने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
इस्रायलमधील हैफा बंदर एक महत्त्वाचे सागरी केंद्र म्हणून काम करते. हे बंदर इस्रायलची 30 टक्क्यांहून अधिक आयात सांभाळते. हे बंदर अदानी पोर्ट्सच्या मालकीचे आहे. याताली 70 टक्के वाटा अदानींचा आहे. मात्र इराणच्या हल्ल्यात बंदराजवळील तेल शुद्धीकरण कारखान्याचे क्षेपणास्त्रांमुळे नुकसान झाले असण्याची शक्यता आहे. मात्र कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
दोन्ही देशांकडून हल्ले
दरम्य़ान, इस्रायलने शुक्रवारी पहाटे इराणवर हल्ला करत इराणमधील अणु, क्षेपणास्त्र आणि लष्करी तळांना लक्ष्य केले. त्यानंतर इराणने इस्रायलवर प्रत्युत्तरात्मक हल्ले केले.दोन्ही देशांनी रविवारी सलग तिसऱ्या दिवशीही हल्ले केले.
इराणने म्हटले आहे की, इस्रायलने दोन तेल शुद्धीकरण प्रकल्पांवर हल्ला केला आहे, ज्याचा परिणाम तेलाच्या जागतिक बाजारपेठांवर होऊ शकतो. तर दुसरीकडे काही इराणी क्षेपणास्त्रांनी इस्रायली हवाई संरक्षण यंत्रणेला चुकवून देशाच्या मध्यभागी असलेल्या इमारतींवर हल्ला केला असल्याची माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.