Attack On Iran : इस्रायल सोबतच्या युद्धानंतर आता समुद्रात इराणवर दुसरा मोठा हल्ला, खामेनेई सरकार हादरलं

Attack On Iran : दोन महिन्यांपूर्वी इराण-इस्रायलमध्ये भीषण युद्ध झालं होतं. 12 दिवस चाललेल्या या युद्धात दोन्ही बाजूना नुकसान झालं. इस्रायलमध्ये वित्तहानी जास्त दिसलेली. पण रणनितीक दृष्टीने इराणला मोठा झटका बसलेला. त्यानंतर आता पुन्हा एकदा समुद्रात इराणवर हल्ला झाला आहे.

Attack On Iran : इस्रायल सोबतच्या युद्धानंतर आता समुद्रात इराणवर दुसरा मोठा हल्ला, खामेनेई सरकार हादरलं
Attack On Iran Ships
| Updated on: Aug 22, 2025 | 7:52 PM

तेहरानच्या समुद्री अर्थव्यवस्थेला मोठा झटका बसला आहे. लॅब-दूख्तेगान हॅकर ग्रुपने इराणचे अनेक तेल टँकर्स आणि कार्गो शिपवर सायबर हल्ला केला. इराणचे 60 पेक्षा जास्त तेल टँकर्स आणि कार्गो शिप्सची कम्युनिकेशन सिस्टिम ठप्प केल्याचा हॅकर ग्रुपचा दावा आहे. या सायबर हल्ल्यामुळे जहाजं आणि बंदरांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. पाश्चिमात्य देशांकडून इराणवर आधीच कठोर प्रतिबंध आहेत. त्यामुळेच त्यांच्या शिपिंग कंपन्यांना आधुनिक टेक्नोलॉजी, वीमा आणि आंतरराष्ट्रीय बंदरांची सुविधा मिळत नाहीय. आता सायबर हल्ल्यांनी इराणचा जहाजांचा ताफा अजून असुरक्षित बनला आहे.

हॅकर्सनी इराणच्या Fanava Group नावाच्या आयटी आणि टेलिकॉम कंपनीच्या सिस्टिममध्ये घुसखोरी केली. ही कंपनी सॅटलाइट कम्युनिकेशन, डाटा स्टोरेज आणि पेमेंट सिस्टिमच काम पाहते. हॅकर्सना जहाजांच्या लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम रूट-लेवल पर्यंत एक्सेस मिळाला आणि त्यांनी Falcon नावाचं सॉफ्टवेअर बंद केलं. हेच सॉफ्टवेअर जहाज आणि बंदरांदरम्यान सॅटेलाइट कम्युनिकेशन कंट्रोल करतं. या सायबर हल्ल्यामुळे जहाजांची AIS म्हणजे ऑटोमेटिक आयडेंटिफिकेशन सिस्टिम आणि सॅटेलाइट ट्रॅकिंग पूर्णपणे बंद झालं.

1. NITC (National Iranian Tanker Company) : ही इराणमधली सर्वात मोठी टँकर कंपनी आहे. या कंपनीकडून वर्षाला 11 मिलियन टन कच्चा तेलाची ने-आण होते. या कंपनीचे टँकर अनेकदा ट्रॅकिंग सिस्टिम बंद करुन प्रतिबंधापासून स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न करतात.

2. IRISL (Islamic Republic of Iran Shipping Lines) : हा इराणमधला सर्वात मोठा कार्गो ऑपरेटर आहे. जवळपास 115 जहाजं या कंपनीच्या ताफ्यात आहेत. इराणच्या अणवस्त्र आणि मिसाइल कार्यक्रमांमुळे अमेरिका, युरोपियन देश आणि संयुक्त राष्ट्राने आधीच इराणवर प्रतिबंध लादले आहेत.

दोन्ही कंपन्यांना 2020 साली अमेरिकेच्या ट्रेजरीने थेट IRGC ची (इस्लामिक रिवॉल्यूशनरी गार्ड कॉर्प्स) मदत केल्याच्या आरोपात ब्लॅकलिस्ट केलं होतं.

याआधी कधी झालेला हल्ला?

इराणी शिपिंगला टार्गेट करण्याची ही पहिली वेळ नाहीय. मार्च 2025 मध्ये याच ग्रुपने 116 जहाजांची कम्युनिकेशन व्यवस्था ठप्प केली होती. अमेरिकेने येमेनमध्ये हुथी बंडखोरांविरोधात केलेल्या कारवाईशी हा हल्ला संबंधित होता, असं त्यावेळी सांगण्यात आलेलं. सायबर हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने नुकतचं 13 कंपन्या आणि आठ जहाजांवर नवीन प्रतिबंध लावले आहेत. त्यांना इराणी तेल निर्यात आणि शस्त्रास्त्र पुरवठ्याशी जोडलं जात आहे.