शांतता करारावर राजी व्हा, अन्यथा संपूर्ण सफाया करु, ट्रम्प यांचा हमासला सज्जड इशारा

हमासने गाझावरील नियंत्रण तातडीने सोडले नाही आणि शांतता करारावर सहमती दर्शवली नाही तर त्यांचा संपूर्णपणे पाडाव केला जाईल अशा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे.

शांतता करारावर राजी व्हा, अन्यथा संपूर्ण सफाया करु, ट्रम्प यांचा हमासला सज्जड इशारा
| Updated on: Oct 05, 2025 | 9:01 PM

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला मोठा इशारा दिला आहे. जर हमासने गाझावरचे नियंत्रण सोडले नाही आणि शांतता कराराला सहमती दिली नाही तर त्याला संपूर्णपणे नष्ट केले जाईल.सीएनएनशी बोलताना ट्रम्प म्हणाले की आम्हाला लवकरच हे कळेल की हमासला वास्तवात शांतता हवी की नको ते. ट्रम्प यांनी असेही म्हटले की बेंजामिन नेतान्याहू देखील अमेरिकेच्या शांती योजनेचे समर्थक आहेत. ट्रम्प म्हणाले की बीबी ( नेतान्याहू ) यावर सहमत आहेत’ त्यामुळे आता हमासच्या कोर्टात चेंडू गेला आहे.

हमासने पटकन निर्णय घ्यावा अन्यथा सर्व संपेल

ट्रम्प यांनी शनिवारी हमासला सावध करीत सांगितले की जर त्याने शांती करारावर लवकर निर्णय घेतला नाही तर सर्व दारे बंद होतील. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवर ट्रम्प यांनी पोस्ट करीत लिहीले की मी इस्रायलला धन्यवाद देत आहे की त्यांनी तात्पुरता बॉम्बहल्ला थांबवला आहे. त्यामुळे ओलीसांची सुटका आणि शांतता करार पू्र्ण होण्यास संधी मिळू शकेल. हमासने आता तातडीने पुढे यावे.अन्यथा सर्व काही संकटात येईल’त्यांनी असेही म्हटले की, गाझाला पुन्हा धोका बनेल असा कोणताही विलंब किंवा परिस्थिती ते आता सहन करणार नाहीत.

अमेरिकेच्या शांतता प्रस्तावाचे महत्वाचे मुद्दे

अमेरिकेच्या शांतता प्रस्तावा अंतर्गत तातडीने युद्धविरामाची मागणी केली आहे. यात ७२ तासांच्या आत २० जीवंत इस्रायली ओलीसांना आणि मारले गेलेल्यांचे मृतदेह यांच्या सुटकेच्या बदल्यात शेकडो पॅलेस्टीनी कैद्यांना सोडण्याचा प्रस्ताव आहे. सामंजस्य करारानंतर गाझात संपूर्ण मानवतेच्या दृष्टीने मदत पाठवली जाईल. परंतू योजनेत हेही स्पष्ट केले आहे की हमासचा गाझातील नव्या सरकारमध्ये कोणतीही भूमिका नसणार आहे.

नेतान्याहू आणि हमास यांचे वेगवेगळे दृष्टिकोन

इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी या प्रस्तावात पॅलेस्टाईन राज्याच्या विचार फेटाळून लावताना म्हटले आहे की, आम्ही पॅलेस्टाईन राज्याच्या तीव्र विरोधात आहोत. आणि हे सामंजस्य करारात कुठेही लिहिलेले नाही. तर हमासने शुक्रवारी स्पष्ट केले की गाझाची प्रशासन व्यवस्था आणि पॅलेस्टाईनच्या अधिकारांशी संबंधित काही मुद्दे अजूनही “राष्ट्रीय मसुद्या” अंतर्गत चर्चेत आहेत, ज्यामध्ये आम्ही सहभागी आहोत .