AI मंत्र्याची आता एन्ट्री! करप्शनला लागणार असा चाप, अल्बानिया देशाचा आश्चर्यकारक निर्णय
देशात एकदा भ्रष्टाचाराचा कीड लागली की विकास खुंटतो. त्यामुळे अल्बानिया या देशाने एक आश्चर्यकारक निर्णय घेतला आहे. देशातील भ्रष्टाचाराला लगाम लावण्यासाठी एआय मंत्र्याची नियुक्ती केली आहे. अल्बानिया सरकारने युरोपियन संघात सहभागी होण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.

एआय अर्थात आर्टिफिशियल इंटिलिजेन्सने तंत्रज्ञान विश्वात एक क्रांती टाकली आहे. एआयच्या माध्यमातून अनेक कामं चुटकीसरशी पूर्ण होत आहे. त्यामुळे एआयने काय करेल याचा आता नेम राहिला नाही. असं असताना अल्बानिया देशाने एक मोठा निर्णय घेतला आहे. एआयची मंत्रिपदी नियुक्ती केली आहे. हा तुम्ही वाचलं ते अगदी खरं आहे. हा कुणी व्यक्ती नसून पिक्सल आणि कोडच्या माध्यमातून तयार केलेला वर्च्युअल मंत्री आहे. या एआय मंत्राचं नाव डिएला ठेवलं गेलं आहे. अल्बानिया भाषेत डिएला या शब्दाचा अर्थ सूर्य असा होता. देशातील भ्रष्टाचाराची पालंमुळं उखडून टाकण्यासाठी अल्बानिया सरकारने हे पाऊल उचललं आहे. आता प्रश्न असा पडतो की एआय मंत्री काम कसं करणार आहे. तर सरकार या एआय मंत्र्याचा वापर ऑडिटर म्हणून करणार आहे. एआय मंत्री पूर्णपणे ऑनलाइन प्रणालीवर काम करेल. त्यामुळे अल्बेनियन सरकारला प्रत्येक गोष्टींचे अपडेट मिळतील. त्यामुळे भ्रष्टाचाराला आळा घालण्यास मदत होईल. पण या एआय मंत्र्याचा वापर खऱ्या अर्थाने अपडेटेड ऑनलाइन गव्हर्नमेंट सिस्टम तयार केल्यानंतर लागू केलं जाईल.
डिएलाकडे प्रभारी मंत्रिपदाचा भार
अल्बानिया देशाच्या दाव्यानुसार, एआय मंत्र्याचा वापर खूपच प्रभावी ठरणार आहे. त्यामुळे टेंडरचा लेखाजोखा ठेवण्यास मदत होईल. तसेच दिलेलं काम आणि खर्च झालेल्या पैशांचा हिशेब मांडणार आहे. त्यामुळे सरकारला फायदा होईल. अनेकदा सरकारी कागदी घोडे नाचवण्यात वेळ जातो. अशा वळी एआयची मदत होणार आहे. एआय सर्व दस्ताऐवज स्टोअर करून ठेवेल. त्यामुळे एका क्लिकवर सर्व काही गोष्टी उपलब्ध होतील. सध्या डिएलाला अल्बानिया सरकारने सार्वजनिक खरेदीचे प्रभारी मंत्रीपद दिलं आहे. युरोपियन युनियनने अल्बानियासमोर एक अट ठेवली आहे. यासाठी त्यांना त्यांच्या देशातील भ्रष्टाचार रोखावा लागणार आहे. हे अल्बानिया समोरचं खूप मोठं आव्हान आहे.
जगातील पहिला कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री नियुक्त करणाऱ्या अल्बानियाची लोकसंख्या सुमारे 28 लाख आहे. अल्बानियाचे पंतप्रधान एडी रामा यांनी आपला चौथा कार्यकाळ सुरु करणार आहेत. या प्रसंगी त्यांनी सांगितलं की, ‘डिएला पहिली कॅबिनेट सदस्य आहे. ती शारीरिक रुपाने उपस्थित नसेल. पण अभासी रुपाने मदत करेल. यामुळे असा देश निर्माण होण्यास मदत होईल जिथे सार्वजनिक निविदा 100 टक्के भ्रष्टाचारमुक्त असतील.’ अल्बानियामध्ये कंत्राटांचे वाटप हे बऱ्याच काळापासून भ्रष्टाचाराचे कारण राहिले आहे.
