
भारतामधील TV9 Network च्या व्यासपीठावर इस्रायलचे भारतातील राजदूत रूवेन अजार यांनी इराणसोबतच्या तणाव आणि युद्धस्थितीवर सविस्तर भाष्य केले. ‘इस्रायलचा दूत’ या सत्रात बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, इराणविरोधातील कारवाई ही इस्रायलची मजबुरी होती आणि दीर्घकाळ संयम बाळगूनही परिस्थिती हाताबाहेर गेल्याने हा निर्णय घ्यावा लागला.
अजार म्हणाले की, गेल्या 25 वर्षांपासून इस्रायलने इराणसोबत तणाव टाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, इराणकडून मध्यपूर्वेत, विशेषतः इस्रायलमध्ये, दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. विविध आंतरराष्ट्रीय निर्बंध असूनही इराणची भूमिका बदलली नाही, त्यामुळे शेवटी इस्रायलला लष्करी कारवाई करावी लागली असे त्यांनी सांगितले.
खामेनेई यांच्या नेतृत्वावरही टीका
यावेळी त्यांनी अयातुल्ला अली खामेनेई यांच्या नेतृत्वावरही टीका केली. ते म्हणाले की, इराणमध्ये गेल्या अनेक दशकांपासून सामान्य लोकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही. तेहरानमधील इस्लामिक गणराज्य शासनाने क्रौर्याच्या सर्व सीमा ओलांडल्या आहेत. जे लोक आज सहानुभूती व्यक्त करत आहेत, त्यांनी इराणमध्ये गेल्या 47 वर्षांपासून सुरू असलेल्या परिस्थितीवर का मौन बाळगले असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
तसेच, अजार यांनी मुज्तबा खामेनेई यांच्याबाबत बोलताना सध्या त्यांचा वेळ नसल्याचे म्हटले. याशिवाय, त्यांनी कासिम सुलेमानी यांच्यावरही गंभीर आरोप करत, इराणमधील दहशतवादाची पायाभरणी त्यांच्या काळात झाली असल्याचा दावा केला.
एका प्रश्नाला उत्तर देताना अजार म्हणाले की, युद्धात हल्ल्यांची संख्या मोजली जात नाही. इस्रायलने इराणला बचावात्मक स्थितीत ढकलले असून, सध्या इराणकडे संवाद साधण्यासाठी सक्षम नेतृत्व नाही. त्यांच्या मते, इराणचे सर्वोच्च नेते सार्वजनिकपणे समोर येत नसल्याने परिस्थिती अधिक गुंतागुंतीची झाली आहे.
2026 च्या सुरुवातीला हजारो लोकांचा बळी
इस्रायलच्या हल्ल्यांचे समर्थन करताना त्यांनी असेही नमूद केले की, इराणमध्ये जानेवारी 2026 च्या सुरुवातीला हजारो लोकांचा बळी गेला, मात्र यावर जागतिक स्तरावर अपेक्षित प्रतिक्रिया उमटली नाही.
अमेरिका-इस्रायल संबंधांबाबत बोलताना अजार यांनी सांगितले की, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील संबंध अत्यंत मजबूत आहेत. अमेरिका इराणबाबत जे निर्णय घेत आहे, ते इस्रायलच्या हिताचेच आहेत आणि दोन्ही देशांमध्ये सातत्याने समन्वय आहे. मध्यपूर्वेत प्रथमच अमेरिका आणि इस्रायल एकत्र येऊन एखाद्या देशाविरुद्ध कारवाई करत असून, हा संयुक्त लष्करी अभियान सुरळीतपणे सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.