
Vladimir Putin Home Attack : रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या निवासस्थानावर तब्बल 91 ड्रोनच्या मदतीने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा केला जातोय. युक्रेनच्या सैन्यानेच हा कट रचल्याचा दावा रशियाकडून केला जातोय. सोबतच आता आम्ही या हल्ल्याला प्रत्युत्तर देणारा अधिकार आमच्याकडे राखून ठेवला आहे, असा इशाराही रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गोई लाव्हरोव्ह यांनी दिलेला आहे. या कथित घटनेमुळे पुन्हा एकदा रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध आणखी पेटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सोबतच या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीदेखील नाराजी व्यक्त केली असल्याचा दावा रशियाकडून केला जातोय. असे असतानाच मोठी आणि खळबळजनक माहिती समोर आली आहे. व्लादिमीर पुतीन यांच्या निवासस्थानावर हल्ला करण्यात आल्याचा कोणताही पुरावा सापडला नसल्याचा एक रिपोर्ट समोर आला आहे. या रिपोर्टनंतर आता रशिया तोंडावर आपटला असल्याचे बोलले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकतील ‘वॉल स्ट्रिट जर्नल’ या वृत्तपत्रात एक रिपोर्ट आला आहे. या रिपोर्टमध्ये अमेरिकेला पुतीन यांच्या घरावर हल्ला झाल्याचा कोणताही पुरावा आढळलेला नाही, असा दावा करण्यात आला आहे. रशियाकडून करण्यात आलेले दावे खरे आहेत की नाही, याचा शोध घेण्याचा प्रयत्न सीआयएकडून घेण्यात आला. या शोधात सीआयएला पुतीन यांच्या घराला लक्ष्य करण्यात आल्याचा कोणताही पुरावा सापडलेला नाही, असे या वृत्तात म्हटलेले आहे. सोबतच अमेरिकेतील अधिकाऱ्यांनी मिळालेल्या गुप्त माहितीचे विश्लेषण केले. या माहितीच्या आधारे पुतीन यांच्या जीवितास कोणताही धोका नाही, असा निष्कर्ष अमेरिकन अधिकाऱ्यांनी काढला आहे. म्हणजेच रशियाने केलेले सर्व दावे हे खोटे आहेत, असे अमेरिकेला वाटत आहे.
दरम्यान, सोमवारी म्हणजेच 29 डिसेंबर 2025 रोजी मॉस्कोच्या नोव्हगोरोड क्षेत्रातील पुतीन यांच्या निवासस्थानावर 91 ड्रोनच्या मदतीने हल्ला करण्यात. या हल्ल्यात कोणतेही नुकसान झालेले नाही. सोबतच हे सर्व ड्रोन पाडण्यात आले, असा दावा रशियाने केला होता. तर युक्रेनने मात्र हे सर्व दावे फेटाळून लावलेले आहेत. त्यामुळे आता याच मुद्द्यावरून दोन्ही देशांतील युद्ध पुन्हा भडकणार का? याची याची चिंता संपूर्ण जगाला लागली आहे.