
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली होती. आज म्हणजे 1 ऑगस्टपासून हा टॅरिफ लागू होणार होता. पण आता हा निर्णय अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी 7 दिवसांसाठी टाळला आहे. आता 25 टक्के टॅरिफ 7 ऑगस्टपासून लागू होणार आहे. ट्रम्प यांनी टॅरिफची घोषणा केल्यापासून भारतात चिंतेच वातावरण आहे. मोदी सरकार विरोधी पक्षांच्या रडारवर आहे. सरकारने गुरुवारी अमेरिकेला कठोर संदेश दिला. केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी संसदेत सांगतिलं की, ‘राष्ट्रहितासाठी गरजेच असलेलं प्रत्येक आवश्यक पाऊल आम्ही उचलू’
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी बुधवारी संध्याकाळी 25 टक्के टॅरिफची घोषणा केली होती. या घोषणेनंतर भारत सरकारकडून वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी, देशहिताच्या दृष्टीने निर्णय घेतला जाईल असं संसदेत सांगितलेलं. त्याचवेळी ट्रम्प यांनी सुद्धा स्पष्ट केलेलं की, टॅरिफ बद्दल भारताशी चर्चा सुरु आहे. भारताच्या वक्तव्यानंतर अमेरिकेकडून टॅरिफ लावण्याचा निर्णय एक आठवड्यासाठी टाळण्यात आला आहे.
दोन्ही देशांच एकमत झालेलं नाही
भारताकडून अमेरिकी साहित्यावर लावल्या जाणाऱ्या टॅरिफवर डोनाल्ड ट्रम्प यांनी आधीच नाराजी बोलून दाखवली आहे. जगात भारतच एक असा देश आहे, जो सर्वात जास्त टॅरिफ वसूल करतो असं ट्रम्प म्हणालेले. भारत-अमेरिकेत सध्या ट्रेड डीलवरुन चर्चा सुरु आहे. जवळपास 1 महिन्यापेक्षा जास्त दिवस झालेत. पण अजून दोन्ही देशांच एकमत झालेलं नाही.
एकाचवेळी किती देशांवर टॅरिफ आकारला?
डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या दुसऱ्या कार्यकाळाला सुरुवात केल्यापासून टॅरिफ बद्दल कठोर भूमिका घेतली आहे. यावेळी त्यांनी एकाचवेळी 92 देशांवर नवीन टॅरिफ आकारले. त्यासाठी त्यांनी एग्जीक्यूटिव ऑर्डरवर स्वाक्षरी केली. त्याआधी ट्रम्प यांनी 2 एप्रिल रोजी जगभरातील देशांवर टॅरिफ आकारण्याची घोषणा केली होती. त्यावेळी सुद्धा 7 दिवसानंतर 90 दिवसासाठी टॅरिफचा निर्णय टाळला होता. त्यानंतर ट्रम्प यांनी 31 जुलै पर्यंतची मुदत दिली. आता 8 ऑगस्ट पर्यंतची वेळ दिली आहे.
पीयूष गोयल काय म्हणाले?
अमेरिकेने भारतावर आकारलेल्या आयात शुल्काचा काय परिणाम होणार याचं आकलन केलं जात आहे. “राष्ट्रीय हित सुरक्षित ठेवणं आणि पुढे जाण्यासाठी सर्व आवश्यक पावलं उचलली जातील” असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल संसदेत म्हणाले होते. “मोदी सरकार शेतकरी, श्रमिक, निर्यातदार, MSME तसच उद्योग जगताचं संरक्षण आणि संवर्धनाला सर्वोच्च महत्त्व देते” असं गोयल म्हणाले. गोयल यांनी सभागृहात वक्तव्य करताना अमेरिकेसोबत झालेल्या चर्चेची माहिती दिली.