
Donald Trump Tariffs : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला चांगलाच धक्का दिला आहे. त्यांनी भारातवर 25 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयाचे भारताकडून विश्लेषण केले जात आहेत. ट्रम्प यांनी भारतासह इतरही काही देशांबाबत अशाच प्रकारचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जगभरातील व्यापार जगतात खळबळ उडाली आहे. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताविरोधात कडक धोरण स्वीकारले असले तरी पाकिस्तानला मात्र पायघड्या घातल्या आहेत. त्यांनी पाकिस्तानला फायदा होईल, असा मोठा निर्णय घेतला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच भारतावर 25 टक्के टॅरिफ लावला आहे. ट्रम्प यांनी पाकिस्तानवरही 29 टक्के टॅरिफ लावला होता. मात्र आता या टॅरिपमध्ये घट करण्याचा निर्णय ट्रम्प यांनी घेतला आहे. पाकिस्तानव्यतिरिक्त बांगलादेशच्याही वस्तूंवरील टॅरिफमध्ये घट करण्यात आली आहे. हे धोरण लवकरच लागू होणार आहे. पाकिस्तानी वस्तूंवर अगोदर 29 टक्के टॅरिफ लावण्यात आला होता. म्हणजे हा टॅरिफ दर भारतापेक्षाही जास्त होता. मात्र आता हाच टॅरिफ थेट 19 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. बांगलादेशवरील हा टॅरिफ दर 35 टक्क्यांनी घटवून 20 टक्क्यांपर्यंत घटवलेला आहे.
अमेरिकेने गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानसाठी पूरक असणारे धोरण स्वीकारले आहे. ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी अमेरिका पाकिस्तानला तेल भांडार विकसित करण्यासाठी मदत करणार आहे, असे सांगितले होते. आम्ही आताच पाकिस्तानसोबत एक करार केला आहे. या कराराअंतर्गत पाकिस्तान आणि अमेरिका आपापले तेल भांडार विकसित करण्यासाठी मदत करतील. या कराराअंतर्गत काम करू पाहणाऱ्या कंपनीच्या आम्ही शोधात आहोत, असे विधान डोनाल्ड ट्रम्प यांनी केले होते. अमेरिकेच्या या भूमिकेचे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी स्वागत केले होते.
दरम्यान, आता अमेरिकेने भारताच्या वस्तूंवर 25 टक्के टॅरिफ लावल्यामुळे भारताला त्याचा फटका बसणार आहे. आता भारत सरकारकडून या निर्णयाचे विश्लेषण केले जात आहे. त्यामुळे भारत यावर नेमका काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.