
अमेरिकन सैन्य वेनेजुएलाजवळ तैनात आहे. ट्रम्प वेनेजुएलावर कधीही हल्ल्याचा आदेश देऊ शकतात, अशा बातम्या येत आहेत. आम्ही हल्ला करणार नाही असं ट्रम्प म्हणतायत. पण धोका कायम आहे. सध्याची दोन्ही देशातील तणावपूर्ण स्थिती लक्षात घेता रशिया आपल्या मित्रासाठी मैदानात उतरला आहे. रशियाचं एक सिक्रेट सैन्य विमान रविवारी वेनेजुएलाची राजधानी कराकसमध्ये उतरलं. त्यानंतर अमेरिकेत एकच खळबळ उडाली. रशियाचं हे पाऊल म्हणजे थेट अमेरिकेला चॅलेंज आहे. अमेरिकेचे कॅरेबियन समुद्रात 10 हजार सैनिक, युद्धनौका, सर्वात मोठी एअरक्राफ्ट कॅरिअर, F-35 फायटर जेट्स आणि अन्य सुरक्षा पथकं तैनात आहेत.
रशियाच्या सिक्रेट विमानाचं उड्डाण खूपच गोपनीय होतं. IL-72 प्लेन 22 ऑक्टोंबरला येकातेरिनबर्गसाठी रवाना झालं. तिथून आर्मेनिया, अल्जेरिया, मोरक्को, सेनेगल आणि मॉरटानिया हे देश करुन कराकस येथे पोहोचलं. हे विमान रशियाचं भाडोत्री सैन्य वॅग्नर ग्रुपशी संबंधित आहे. रशियन कंपनी एवियाकॉन जिटोट्रांस या विमानाचं संचालन करते. अमेरिकेने या रशियन कंपनीला प्रतिबंधाच्या यादीत टाकलं होतं. रशियन संरक्षण मंत्रालयासाठी एवियाकॉन जिटोट्रांस ही कंपनी शस्त्रास्त्र आणि सैन्य उपकरणं प्रतिबंधित देशात पोहोचवते असा अमेरिकन सरकारचा आरोप होता.
सर्वात मोठी विमानवाहू युद्धनौका USS गेराल्ड फोर्ड तैनात
कॅरेबियन समुद्रात सैन्य तैनाती ही ड्रग्ज माफियांना रोखण्यासाठी आहे असं अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. पण टीकाकाराचं असं म्हणणं आहे की, वेनेजुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांना सत्तेवरुन हटवण्यासाठी हे सर्व सुरु आहे. ट्रम्प यांनी CIA ला सुद्धा वेनेजुएलामध्ये सीक्रेट ऑपरेशन करण्याची परवानगी दिली आहे. मादुरो यांचं म्हणणं आहे की, अमेरिका एका खोट्या युद्धाचा खेळ रचत आहे. ज्यामुळे त्यांना सत्तेवरुन हटवता येईल. 24 ऑक्टोंबरला अमेरिकेने आपली सर्वात मोठी विमानवाहू युद्धनौका USS गेराल्ड फोर्डला कॅरेबियनच्या समुद्रात तैनात केल्यानंतर दोन्ही देशातील तणाव आणखी वाढला.
त्या विमानात काय आहे?
रशिया आणि वेनेजुएलामध्ये आधीपासून चांगले संबंध आहेत. मे 2025 मध्ये रशियन प्रमुख व्लादीमीर पुतिन आणि राष्ट्रपती मादुरो यांनी मॉस्को येथे एका रणनितीक करारावर स्वाक्षरी केली होती. यात ऊर्जा, व्यापार आणि संरक्षण सहकार्य याचा समावेश आहे. रशियाने आतापर्यंत वेनेजुएलाला 4 अब्ज डॉलरची शस्त्र दिली होती. यात रणगाडे, जेट आणि ड्रोन्स आहेत. त्याशिवाय रशियन सैन्याने वेनेजुएलाच्या सैनिकांना ट्रेनही केलं आहे. रशियाचं जे विमान वेनेजुएलामध्ये उतरलं, त्यात काय आहे? हे अजून समोर आलेलं नाही. पण एका मोठ्या कारवाईआधी रशियन विमानाचं वेनेजुएलामध्ये लँड होणं हे मोठे संकेत आहेत.