
सध्या डोनाल्ड ट्रम्प हे जगभरात त्यांच्या टॅरिफ नितीमुळे चर्चेत आहेत. त्यांनी वेगवेगळ्या देशातून अमेरिकेत आयात होणाऱ्या साहित्यावर अव्वाच्या सव्वा टॅरिफ आकारला आहे. यामुळे जगातील अनेक देश चिंतेत आहेत. यात भारताची चिंता जास्त आहे. कारण भारतावर डोनाल्ड ट्रम्प यांनी 50 टक्के टॅरिफ आकारला आहे. डोनाल्ड ट्रम्प हे प्रेक्षाभक वक्तव्य करण्यासाठी सुद्धा ओळखले जातात. आता सुद्धा त्यांनी असच एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे. अमेरिकी राष्ट्रपती ट्रम्प यांनी दावा केलाय की, त्यांनी 9/11 दहशतवादी हल्ल्याच्या वर्षभरआधीच ओसामा बिन लादेनबद्दल सर्तक केलं होतं. ट्रम्प वर्जीनियाच्या नॉरफॉक येथे अमेरिकन नौदलाच्या 250 व्या वर्षपूर्तीच्या कार्यक्रमात बोलत होते. “वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्याच्या एक वर्ष आधीच हल्ल्याचा मास्टरमाइंड लादेनबद्दल मी इशारा दिला होता. पण कोणी माझँ ऐकलं नाही“ असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.
“मी एका हल्ल्याच्या एकवर्ष आधी बोललेलो की, मी ओसामा नावाच्या एका व्यक्तीला पाहिलय. तो मला अजिबात आवडला नव्हता. मी म्हणालेलो, त्याच्यावर नजर ठेवली पाहिजे“ असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. ट्रम्प स्वत:च कौतुक करताना म्हणाले की, ‘मला याचं श्रेय मिळालं पाहिजे‘. ट्रम्प यांचं हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होतय.
नेवी सील कमांडोजच कौतुक
डोनाल्ड ट्रम्प यांनी ओसामा बिन लादेनचा खात्मा करणाऱ्या नेवी सील कमांडोजच कौतुक केलं. त्यांनी सांगितलं की, US नेवीने लादेनचा मृतदेह एअरक्राफ्ट कॅरिअर USS कार्ल विन्सनवरुन समुद्रात फेकला होता. खोल समुद्रात त्याचं दफन व्हावं हा त्यामागे उद्देश होता. 2011 साली नेवी सीलचे कमांडोज पाकिस्तानच्या अबोटाबादमध्ये दाखल झाले. लादेनला त्यांनी संपवलं. त्यावेळचे तात्कालिन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबाम यांच्या आदेशाने हे ऑपरेशन पार पडलेलं.
अफगाणिस्तान युद्धात अमेरिकेच्या पराभवावर सुद्धा डोनाल्ड ट्रम्प बोलले. अमेरिकन सैन्य आणि नौदल जवानांच्या शौर्याच त्यांनी कौतुक केलं.
अजून ट्रम्प यांनी काय-काय दावे केले?
ट्रम्प यांनी याआधी सुद्धा अनेक दावे केले आहेत. भारत-पाकिस्तानमध्ये सीजफायर घडवून आणल्याचा त्यांचा दावा आहे. 2020 साली अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत गडबड झाल्याचा दावा सुद्धा त्यांनी केलेला. स्वत: केलेल्या आरोग्य आणि आर्थिक सुधारणा यशस्वी असल्याच ते म्हणाले. अफगाणिस्तान युद्ध संपवण्यासाठी चांगली रणनिती बनवल्याचा दावा सुद्धा ट्रम्पनी केला.