
‘पाकिस्तानात दहशतवादाला आश्रय मिळतो…’ या संरक्षणं मंत्री ख्वाजा आसिफ यांच्या वक्तव्यावर माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी शिक्कामोर्तब केलं आहे. या बाबतीत पाकिस्तानचा एका भूतकाळ होता हे बिलावल भुट्टो यांनी मान्य केलय. “पाकिस्तानात पाळलेल्या या दहशतवाद्यांनीच माझ्या आईची हत्या केली. मी स्वत: या दहशतवादाचा बळी ठरलोय” असं बिलावल भुट्टो म्हणाले. “मला वाटत नाही की, हे कुठलं सिक्रेट आहे. पाकिस्तानचा एक भूतकाळ होता. आम्ही याची मोठी किंमत चुकवली आहे. कट्टरपंथीयांच्या लाटेचा सामना करत त्यातून आम्ही धडा शिकलो. यातून अंतर्गत सुधारणा केलीय. हा सगळा इतिहास आहे. आम्ही आता यात सहभागी नाही” असं बिलावल भुट्टो म्हणाले. स्काय न्यूजशी बोलताना त्यांनी ही कबूली दिली.
पाकिस्तानचा भूतकाळ हा दहशतवादाशी संबंधित होता हे बिलावल यांनी मान्य केलं. ‘पाकिस्तानचा एक भूतकाळ आहे. यामुळे देशाने बरच काही सहन केलय’ असं बिलावल भुट्टो म्हणाले. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी स्काय न्यूजला दिलेल्या मुलाखतीत मान्य केलं की, ‘पाकिस्तानने अनेक दशक दहशतवादाच समर्थन आणि फंडिंग केलं’
‘अमेरिकेसाठी घाणेरडी काम केली’
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले की, “आम्ही तीन दशकं अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांसाठी घाणेरडी कामं केली. ही एक मोठी चूक होती, ज्याची शिक्षा आम्ही भोगली” 22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी 26 निरपराध भारतीय पर्यटकांची हत्या केली. लश्कर-ए-तैयबाने हा हल्ला घडवून आणला. यामागे पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा ISI आणि पाकिस्तानी सैन्याचा हात आहे. सध्या भारत-पाकिस्तान युद्ध होऊ शकतं, अशी तणावाची स्थिती आहे. अशावेळी पाकिस्तान सरकारशी संंबंधित या दोन्ही नेत्यांनी आमचा दहशतवादाशी संबंध होता ही कबुली दिली आहे.
बिलावल भुट्टोकडून पुन्हा युद्धाचा राग
गुरुवारी मीरपुरखास येथे एका रॅलीला संबोधित करताना बिलावल भुट्टो म्हणाले की, “पाकिस्तानला शांतता हवी आहे. पण भारताने चिथावणी दिली, तर युद्धासाठी आम्ही तयार आहोत. आम्हाला युद्ध नकोय. पण कोणी सिंधुवर हल्ला केला, तर त्याला सडेतोड प्रत्युत्तर देऊ” पाकिस्तानी नेत्यांच्या या वक्तव्यावरुन त्यांचा दुटप्पीपणा दिसून आलाय.