भारताचा डोनाल्ड ट्रम्प यांना दणका, अमेरिकेच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष, रशियाकडून…

India Russia Oil trade: अमेरिका रशियाकडून कच्चे तेल न खरेदी करण्यासाठी भारतावर दबाव टाकत आहे. मात्र भारताने डोनाल्ड ट्रम्प यांच्या हातावर तुरी दिल्याचे समोर आले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

भारताचा डोनाल्ड ट्रम्प यांना दणका, अमेरिकेच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष, रशियाकडून...
india russia trade
| Updated on: Nov 03, 2025 | 6:52 PM

अमेरिका रशियाकडून कच्चे तेल न खरेदी करण्यासाठी भारतावर दबाव टाकत आहे. मात्र भारताने डोनाल्ड ट्रम्प यांच्या हातावर तुरी दिल्याचे समोर आले आहे. कारण भारताने ऑक्टोबरमध्ये रशियाकडून कच्च्या तेलाची आयात वाढवली. केप्लर आणि ऑइलएक्सने याबाबत आकडेवारी सादर केली आहे. यानुसार भारताने ऑक्टोबरमध्ये दररोज सुमारे 1.48 दशलक्ष बॅरल रशियन तेल खरेदी केले. हा आकडा सप्टेंबरमधील दररोज 1.44 दशलक्ष बॅरलपेक्षा जास्त आहे. तसेच या आकडेवारीत कझाकस्तानमधून रशियामार्गे आयात केलेल्या तेलाची आकडेवारी नाही. याचा अर्थ अमेरिकेच्या दबावाला बळी न पडता भारताने तेलाची खरेदी सुरू ठेवली आहे.

नोव्हेंबरमध्ये घट होण्याची शक्यता

भारताची ही खरेदी जास्त काळ सुरू राहणार नाही, कारण गेल्या महिन्यात अमेरिकेने लुकोइल आणि रोझनेफ्ट या दोन प्रमुख रशियन तेल कंपन्यांवर नवीन निर्बंध लादले आहेत. त्यामुळे भारतीय रिफायनरीजने या कंपन्यांना नवीन ऑर्डर देने बंद केले आहे. अमेरिकेने या कंपन्यांना 21 नोव्हेंबरपर्यंत या रशियन उत्पादकांशी व्यापार थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे 21 नोव्हेंबर नंतर या कंपन्यांकडून भारताला होणारा तेल पुरवठा कमी होणार आहे.

भारत नवीन तेल विक्रेत्याच्या शोधात

रशियाकडून होणारा तेलपुरवठा कमी होणार असल्याने भारताने भारताने पर्यायी स्रोतांचा शोध सुरू केला आहे. मंगळुरू रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्सने ग्लेनकोर येथून अबू धाबीच्या मुर्बन क्रूड तेलाचे 2 दशलक्ष बॅरल खरेदी केले आहेत. तसेच इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने 2026 च्या पहिल्या तिमाहीसाठी अमेरिकेकडून 24 दशलक्ष बॅरल तेलासाठी निविदा मागवली आहे. याचाच अर्थ भारत तेलाची टंचाई दूर करण्यासाठी नवीन तेल विक्रेत्या देशांचा शोध घेत आहे.

भारत रशियाकडून सर्वात जास्त तेल खरेदी करतो

गेल्या काही वर्षांपासून भारताने रशियाकडून सर्वात जास्त तेल खरेदी केले आहे. 2025 च्या पहिल्या नऊ महिन्यांत, भारताने दररोज सरासरी 1.9 दशलक्ष बॅरल रशियन तेल खरेदी केले आहे. हा आकडा रशियाच्या एकूण निर्यातीच्या 40% आहे. याचाच अर्थ भारत रशियासाठी सर्वात मोठा भागीदार आहे. मात्र आगामी काळात ही खरेदी कमी होणार आहे.