मोठी बातमी: इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा पंतप्रधान मोदींना फोन, पाहा मोदींना काय दिली माहिती

PM Netanyahu call to PM Modi : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला आहे. एकीकडे हमास सोबत संघर्ष सुरु असताना नेतन्याहू यांनी केलेल्या फोनकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. दोघांमध्ये सध्याच्या परिस्थितीवर चर्चा झाली.

मोठी बातमी: इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा पंतप्रधान मोदींना फोन, पाहा मोदींना काय दिली माहिती
| Updated on: Oct 10, 2023 | 10:49 PM

Israel Hamas War : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला आहे. इस्रायल आणि हमास यांच्यात शनिवारी सुरु झालेला संघर्ष अजूनही सुरुच आहे. पंतप्रधान नेतन्याहू यांनी हमास विरोधात कारवाई आणखी वाढवली आहे. याक्षणी त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला आहे. फोनवर नेतन्याहू यांच्यासोबत चर्चा झाल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले आहे. भारत आणि इस्रायल यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ नंतर ही मैत्रित भर पाडली आहे. इस्रायलने पंतप्रधान मोदी यांच्या समर्थनासाठी आभार मानले आहे. पंतप्रधान मोदी यांनी आधीच आपण इस्रायल सोबत उभे असल्याची भूमिका मांडली होती.

हमास दहशतवादी संघटनेने शनिवारी इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वात आधी पुढे येत याचा निषेध केला होता.  इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात संघर्ष सुरु झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी इस्रायलला साथ दिली. पंतप्रधान मोदी म्हणाले होते, ‘इस्रायलमधील दहशतवादी हल्ल्याच्या वृत्ताने खूप धक्का बसला. आमचे विचार आणि प्रार्थना निष्पाप पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत. या कठीण काळात आम्ही इस्रायलच्या पाठीशी उभे आहोत.

भारत हा प्रभावशाली देश आहे: इस्रायलचे राजदूत

भारतातील इस्रायलचे राजदूत नाओर गिलॉन यांनी म्हटले की, आम्हाला भारताच्या भक्कम पाठिंब्याची गरज आहे. भारत हा एक प्रभावशाली देश आहे आणि तो दहशतवादाचे आव्हान समजून घेतो आणि या संकटाचीही त्याला चांगली जाणीव आहे. यावेळी हे अत्यंत महत्वाचे आहे की आम्हाला सर्व काही करण्याची क्षमता दिली गेली आहे जेणेकरून हमास अत्याचार चालू ठेवू शकणार नाही.

‘आम्हाला भारताकडून मोठा पाठिंबा मिळाला आहे. आम्हाला आशा आहे की जगातील सर्व देश शेकडो इस्रायली नागरिक, स्त्रिया, पुरुष, वृद्ध आणि मुले यांच्या अकारण हत्या आणि अपहरणाचा निषेध करतील. हे अस्वीकार्य आहे.’