
बांग्लादेशप्रमाणेच नेपाळमध्ये देखील सत्तापालट झाली आहे. सत्तापालट झाल्यानंतर आता नेपाळच्या राजकारणात मोठं ट्विस्ट आलं आहे. माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली, शेर बहादूर देउबा, पुष्प कमल दहल (प्रचंड) यांच्यासोबतच माजी ऊर्जा मंत्री दीपक खडका आणि त्यांची पत्नी अरजू राणा यांना काठमांडू सोडण्यास नेपाळमधील काळजीवाहू सरकारने प्रतिबंध केला आहे. नेपाळमध्ये जेन झेडचं आंदोलन सुरू असतानाच त्यांच्या घरात नोटा जाळल्याचा एक व्हिडीओ समोर आला होता. त्यामुळे आता नेपाळच्या काळजीवाहू सरकारने या नेत्यांविरोधात मनी लॉन्ड्रिंग आणि भ्रष्टाचाराची चौकशी सुरू केली आहे.
या नेत्यांविरोधात मनी लॅन्ड्रिंग आणि भ्रष्टाचाराची चौकशी सुरू झाल्यामुळे आता त्यांना काठमांडू सोडून जण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. बांग्लादेशमध्ये जेव्हा उठाव झाला होता आणि तेथील सरकार कोसळं होतं तेव्हा बांग्लादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना या तातडीनं बांग्लादेश सोडून भारताच्या आश्रयाला आल्या होत्या. मात्र आता केपी ओली यांच्या अडचणीत वाढ झाली आहे, त्यांना नेपाळ सोडता येणार नाहीये.
काठमांडू पोस्टच्या एका रिपोर्टनुसार नेपाळच्या मनी लॉन्ड्रिंग चौकशी विभागानं या नेत्यांविरोधात चौकशीला सुरुवात केली आहे. चौकशीदरम्यान या नेत्यांच्या घरात जाळण्यात आलेल्या नोटांचे आवशेष, राख आणि इतर काही महत्त्वाच्या वस्तू गोळा करण्यात आल्या आहेत या सर्व वस्तुंना नेपाळच्या राष्ट्रीय फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आलं आहे. या प्रकरणावर बोलताना नेपाळच्या मनी लॉन्ड्रिंग चौकशी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, या नेत्यांच्या घरात पैसे जाळल्याचे व्हिडीओ समोर आले होते, याच आधारावर आता ही चौकशी सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान दुसरीकडे मात्र शेर बहादूर देउबा यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. माझ्यावरील सर्व आरोप खोटे आहेत, आपल्याला बदनाम करण्यासाठी हा कट रचला जात आहे, ओढून-ताणून आरोप केले जात आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे नेपाळचे माजी परराष्ट्र मंत्री अरजू राणा देउबा यांच्यावर देखील भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, त्यांनी देखील आपल्यावरील आरोपांचे खंडण केले आहे.