
पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये आज नमाज पठणाच्यावेळी एका मशिदीमध्ये शक्तीशाली बॉम्बस्फोट झाला. या बॉम्बस्फोटात 50 जण ठार झाले आहेत. 70 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या तीन हॉस्पिटल्समध्ये दाखल करण्यात आलय. पाकिस्तानी मिडिया डॉनने या हल्ल्यात 10 जणांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे. रिपोर्टनुसार जखमींना पाकिस्तानच्या इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायसेज (पीआयएम) आणि सीडीए हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं आहे.
पाकिस्तानात अलीकडे झालेला हा मोठा दहशतवादी हल्ला आहे. स्फोटानंतर मृतदेहांचे अवयव इथे-तिथे विखरुन पडलेले होते. प्राथमिक दृष्टया हा आत्मघातकी हल्ला असल्याचं म्हटलं आहे. घटनास्थळी पोलीस आणि सैन्याची टीम पोहोचली आहे. सैन्याने पूर्ण भागाला घेराव घातला आहे. स्थानिक मीडियानुसार हा स्फोट कसर-ए-खदीजतुल कुबरा मशिदीत झालाय. इस्लामाबादमधील या मशिदीला बडी मशीद सुद्धा म्हटलं जातं. घटनेनंतर काही व्हिडिओ फुटेज व्हायरल झालय. यात लोक सैरावैरा पळताना दिसतायत. ब्लास्टनंतर खबरदारी म्हणून सगळ्या इस्लामाबादमध्ये इमर्जन्सी घोषित करण्यात आली आहे.
ती शिया समुदायाची मशीद मानली जाते
तारलाईच्या ज्या मशिदीत हल्ला झालाय. ती शिया समुदायाची मशीद मानली जाते. पाकिस्तानात शिया समुदायाची लोकसंख्या 2 कोटी आहे. पाकिस्तानच्या एकूण लोकसंख्येच्या हे प्रमाण 10 ते 12 टक्के आहे. नोव्हेंबर 2025 नंतर इस्लामाबादमध्ये झालेला हा दुसरा शक्तीशाली स्फोट आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये इस्लामाबाद कोर्टाच्या बाहेर स्फोट झाला होता. यात 12 लोकांचा मृत्यू झालेला. 36 जण जखमी झालेले. हा हल्ला तहरीक ए तालिबानने केला होता.