महाराणी एलिझाबेथ यांच्यावर अंत्यसंस्कार कधी? नेते खासगी विमानानं येणार नाहीत? काय आहेत नियम?

| Updated on: Sep 12, 2022 | 10:47 AM

प्रत्येक देशातील एकच प्रतिनिधी आणि त्यांची पत्नी यांना अंत्यसंस्कारासाठी येण्याची परवानगी असेल. यासंबंधीचे पत्र सर्व देशांतील दूतावासांना शनिवारी रात्री पाठवण्यात आले आहेत.

महाराणी एलिझाबेथ यांच्यावर अंत्यसंस्कार कधी? नेते खासगी विमानानं येणार नाहीत? काय आहेत नियम?
19 सप्टेंबर रोजी राणी एलिझाबेथ यांच्यावर अंत्यसंस्कार
Image Credit source: social media
Follow us on

लंडनः महाराणी एलिझाबेथ (Queen Elizabeth) द्वितीय यांच्या पार्थिवावर 19 सप्टेंबर रोजी अंत्यसंस्कार (Funeral) केले जाणार आहेत. यासाठी शाही घराण्याकडून मोठी तयारी आणि सुरक्षेच्या उपाययोजना केल्या जात आहेत. रविवारी महाराणीचे ताबूत बाल्मोरल कॅसल येथून स्कॉटलँडला (Scotland) आणण्यात आले. स्कॉटलँडमधील होलीरुड हाऊस पॅलेसमध्ये हे ताबूत ठेवण्यात आले. प्रवासात हजारो नागरिकांनी महाराणीला श्रद्धांजली वाहिली. महाराणीच्या अंत्यसंस्कारावेळी नियमांचं काटेकोरपणे पालन केलं जाईल. विशेष म्हणजे या समारंभाला येणाऱ्या जागतिक नेत्यांसाठीही नियमावली जारी करण्यात आली आहे.

अंत्यसंस्कारासाठी जारी केलेल्या निर्देशांनुसार, इतर देशांतील नेते किंवा प्रतिनिधींना येथे खासगी विमानात येण्यास मनाई करण्यात आली आहे. सर्वांनी कमर्शियल फ्लाइटमधून महाराणीच्या अंत्यसंस्काराला यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. हेलिकॉप्टर वापरण्यासही बंदी आहे.

महाराणी एलिझाबेथ यांच्या पार्थिवावर 19 सप्टेंबर रोजी वेस्ट मिंस्टर येथे अंत्यसंस्कार होतील. यावेळी जागतिक नेत्यांनी कारदेखील आणू नये, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

नेत्यांना अंत्यसंस्काराच्या स्थळी पोहोचण्याकरिता विशेष बसची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे अमेरिकी राष्ट्राध्यक्ष येथे आले तर तेसुद्धा बसने प्रवास करतील का, असा प्रश्न विचारला जातोय.

या अंत्यसंस्कारावेळी इतर देशांचे राष्ट्राध्यक्ष किंवा पंतप्रधानांसोबत त्यांच्या पत्नीदेखील सहभागी होऊ शकतील. ब्रिटनमध्ये या कार्यक्रमासाठी सर्वात मोठं आयोजन करण्यात आलंय.

या अंत्यसंस्कारासाठी ब्रिटनचे फॉरेन, कॉमनवेल्थ अँड डेव्हलपमेंट ऑफिसने यासाठी प्रोटोकॉल जारी केले आहेत. 19 सप्टेंबर रोजी वेस्टमिंस्टर अॅबे पूर्णपणे भरलेले असेल.

प्रत्येक देशातील एकच प्रतिनिधी आणि त्यांची पत्नी यांना अंत्यसंस्कारासाठी येण्याची परवानगी असेल. यासंबंधीचे पत्र सर्व देशांतील दूतावासांना शनिवारी रात्री पाठवण्यात आले आहेत.

विभागाने जारी केलेल्या पत्रानुसार, एखाद्या देशाचे राष्ट्राध्यक्ष अंत्यसंस्काराला येणार नसतील तर ते अन्य प्रतिनिधीला पाठवू शकतात.

सर्व प्रतिनिधींना पश्चिम लंडन येथून बसद्वारे अंत्यसंस्काराच्या ठिकाणी वेस्ट मिंस्टर येथे आणलं जाईल. यावेळी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.