मोबाईलची बॅटरी बनवणाऱ्या तीन शास्त्रज्ञांचा नोबेलने सन्मान

स्टॅनली विटंगम इंग्लिश-अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ असून ते सध्या बिंगम्टन विद्यापीठात प्राध्यापक आहेत. तर अकिरा योशिनो जपानचे शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी लिथियम आयन बॅटरीचा अविष्कार केला आहे.

मोबाईलची बॅटरी बनवणाऱ्या तीन शास्त्रज्ञांचा नोबेलने सन्मान

स्टॉकहोम, स्वीडन : 2019 वर्षासाठीचं रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक (Chemistry Nobel prize 2019) तीन शास्त्रज्ञांना संयुक्तपणे देण्यात येणार आहे. जॉन बी गुडइनफ, एम स्टॅनली विटंगम आणि अकिरा योशिनो या शास्त्रज्ञांना या वर्षासाठीचं नोबेल पारितोषिक देण्यात येईल. 97 वर्षीय जॉन गुडइनफ हे अमेरिकेत प्राध्यापक असून या वयात पारितोषिक (Chemistry Nobel prize 2019) मिळवणारे ते पहिलेच व्यक्ती ठरले आहेत. याशिवाय स्टॅनली विटंगम इंग्लिश-अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ असून ते सध्या बिंगम्टन विद्यापीठात प्राध्यापक आहेत. तर अकिरा योशिनो जपानचे शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी लिथियम आयन बॅटरीचा अविष्कार केला आहे.

पुन्हा रिचार्ज होणाऱ्या, हलक्या आणि शक्तीशाली लिथियम आयन बॅटरीचा वापर आता मोबाईल फोन, लॅपटॉपपासून ते ईलेक्ट्रॉनिक वाहनांपर्यंत केला जातो. यामुळे सौर आणि पवन ऊर्जा संग्रहित करणंही शक्य होतंय, ज्यामुळे पेट्रोल आणि डिझेलमुक्त समाजाच्या दिशेने वाटचाल करणं शक्य होईल, अशी प्रतिक्रिया निवड मंडळाने जारी केली. हे तीन शास्त्रज्ञ पुरस्काराची 90 लाख स्वीडिश क्रोनोर (914000 डॉलर) रक्कम आपापसात वाटून घेतील, असंही रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेने सांगितलं.

यापूर्वी भौतिकशास्त्रातील नोबेलची घोषणा झाली होती. हा पुरस्कारही तीन शास्त्रज्ञांना देण्यात आलाय, ज्यामध्ये अमेरिकन शास्त्रज्ञ जेम्स पीबल्स, स्वित्झर्लंडचे शास्त्रज्ञ मायकल मेयर आणि डिडियर क्लोजोव यांच्या नावाचा समावेश आहे. जेम्स यांना हा पुरस्कार विश्वउत्पत्तिशास्त्रासाठी, तर इतर दोन शास्त्रज्ञांचा सन्मान सूर्यासारख्या ताऱ्यांच्या एक्जोप्लॅनेट ऑर्बिटिंगसंबंधी संशोधनासाठी करण्यात आला होता.

वैद्यकशास्त्राचं नोबेल पारितोषिकही तीन शास्त्रज्ञांना देण्यात येणार आहे. यामध्ये विल्यम जी कॉलिन, पीटर जे रेटक्लिफ आणि ग्रेग एल सेमेंजा यांचा समावेश आहे. पेशींच्या ऑक्सिजन उपलब्धतेवर अभ्यास करुन त्याला अनुकूल संशोधन केल्यामुळे या तीन शास्त्रज्ञांना सन्मान करण्यात येणार आहे. 10 डिसेंबरला एका औपचारिक समारंभात नोबेल विजेत्यांना सन्मान केला जाईल.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *