डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडाली, ग्रीनलँडवरून वातावरण तापलं, दोन बड्या देशांचा अमेरिकेला थेट इशारा

Donald Trump : अमेरिकेने ग्रीनलँडवर कब्जा करण्याबाबत भाष्य केले आहे. अमेरिकेच्या या भूमिकेबाबत आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रमक अमेरिका फर्स्ट या धोरणाला जगातील अनेक देशांकडून विरोध होत आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडाली, ग्रीनलँडवरून वातावरण तापलं, दोन बड्या देशांचा अमेरिकेला थेट इशारा
trump sad usa
Image Credit source: Google
| Updated on: Jan 20, 2026 | 9:26 PM

गेल्या काही दिवसांपासून जगात ग्रीनलँडचा मुद्दा चर्चेत आहे. अमेरिकेने ग्रीनलँडवर कब्जा करण्याबाबत भाष्य केले आहे. अमेरिकेच्या या भूमिकेबाबत आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रमक अमेरिका फर्स्ट या धोरणाला जगातील अनेक देशांकडून विरोध होत आहे. या प्रकरणी जागतिक स्तरावरील राजकारण तापले आहे. आता चीन आणि फ्रान्सने जागतिक व्यासपीठावरून अमेरिकेला स्पष्ट इशारा दिला आहे. दावोस येथील जागतिक आर्थिक मंचात (WEF) चीनचे उपपंतप्रधान हे लिफेंग आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी केलेल्या विधानांमुळे डोनाल्ड ट्रम्प यांची चिंता वाढली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

चीनचा अमेरिकेला इशारा

ग्रीनलँडच्या मुद्द्यावर बोलताना चीनचे उपपंतप्रधान हे लिफेंग म्हणाले की, ‘शक्तिशाली देश कमकुवत देशांची शिकार करतात अशा जंगलाच्या कायद्याकडे परत जाऊ शकत नाही.’ पुढे बोलताना त्यांनी म्हटले की, काही निवडक देशांना स्वार्थाच्या आधारावर विशेषाधिकार मिळू नयेत आणि सर्व देशांना त्यांच्या कायदेशीर हितांचे रक्षण करण्याचा समान अधिकार आहे. चीनचे हे विधान अशा वेळी आले आहे जेव्हा अमेरिका ग्रीनलँड सोडण्यासाठी डेन्मार्कवर दबाव आणत आहेत.

चीनचे उपपंतप्रधान हे लिफेंग यांनी थेट अमेरिका किंवा ट्रम्प यांचा उल्लेख केला नसला तरी त्यांच्या विधानाचे संबंध थेट ट्रम्प यांच्या धोरणांशी जोडला जात आहे. अमेरिकेच्या हेतूंमुळे, ग्रीनलँडसारख्या धोरणात्मक क्षेत्रांबद्दल, युरोप आणि आशियामध्ये अस्वस्थता वाढली आहे. यामुळे चीनने व्यापारच्या बाबतीत अमेरिकेला कोंडीत पकडले आहे. जर आगामी काळात ट्रम्प यांनी त्यांची भूमिका बदलली नाही तर चीन कठोर पावले उचलण्याची शक्यता आहे.

अमेरिकेच्या व्यापार धोरणावर टीका

अमेरिकेच्या ट्रम्पच्या व्यापार धोरणांवर आणि अमेरिका प्रथम या अजेंडावर टीका करताना, चीनच्या उपपंतप्रधानांनी एकतर्फी कृती आणि करारांचा निषेध केला. त्यांनी म्हटले की, ‘अशा कृती जागतिक व्यापार संघटनेच्या (WTO) नियमांचे उल्लंघन करतात. यामुळे सध्याच्या बहुपक्षीय व्यापार प्रणालीला अभूतपूर्व आणि गंभीर आव्हानांचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, गेल्या वर्षी चीन आणि अमेरिकेत तीव्र व्यापार युद्ध झाले होते. त्यावेळी दोन्ही देशांनी एकमेकांच्या उत्पादनांवर अब्जावधी डॉलर्सचे कर लादले होते.

फ्रान्सचेही अमेरिकेवर भाष्य

याच व्यासपीठावरून फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनीही जागतिक व्यवस्थेबद्दल आक्रमक विधान केले आहे. मॅक्रॉन म्हणाले की, ‘आपण अशा जगाकडे वाटचाल करत आहोत जिथे नियम कमकुवत होत आहेत किंवा पूर्णपणे गायब होत आहेत.” मॅक्रॉन यांचे हे विधान आंतरराष्ट्रीय कायद्याच्या आणि नियमांवर आधारित जागतिक व्यवस्थेच्या विघटनाकडे बोट दाखवते आहे.