
China And Taiwan Clash : गेल्या काही वर्षांपासून जगाने इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाचा धसका घेतला होता. आता या दोन्ही देशांत शांतता करार पार पडतोय. एक युद्ध आता थांबलेले आहे. असे असतानाच आता भारताचा शेजारी असलेला चीन हा देश मात्र नवी कुरापत काढू पाहात आहे. हा देश नव्या युद्धाच्या तयारीत आहे. गेल्या काही दिवसांपासून चीनच्या सैन्याकडून मोठ्या हालचाली केल्या जात आहे. त्यामुळेच चीनच्या डोक्यात नेमके काय चालले आहे? असा सवाल उपस्थित केला जात आहे. चीनची काही विमानं आणि युद्धनौका तैवानच्या आसपास घिरट्या घालताना दिसली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार चीनची पिपल्स लिबरेशन आर्मीची 13 लढाऊ विमाने तसेच नौसेनेची 6 जहाजे तैवानच्या आसपास सक्रिय असलेले दिसून आले. यातील 8 विमाने तैवानच्या उत्तरी, दक्षिण-पश्चिमी आणि दक्षिण-पूर्वी हवाई संरक्षण ओळख क्षेत्रात दिसून आली आहेत. चीनच्या सैन्याच्या हलाचाली लक्षात घेऊन तैवानचे लष्करदेखील अलर्ट मोडवर आहे. आम्ही चीनच्या लष्कराच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहोत असे तैवानने सांगितले आहे. तसेच योग्य असणारे प्रत्युत्तरही आम्ही दिले आहे, असे तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले आहे.
तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने एक्स या समाजमाध्यमावर चीनच्या लष्कराच्या या हालचालींविषयी माहिती दिली आहे. ’13 चीनी विमाने तसेच नौसेनेची 6 जहाजे तैवानच्या जवळपास दिसून आली. यातील 8 विमानांनी तैवनाच्या हवाई संरक्षण ओळख क्षेत्रात प्रवेश केला. आमचे सैन्य या स्थितीवर लक्ष ठेवून आहे. सध्याच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी आमच्या सैन्याकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे,’ असे संरक्षण मंत्रालयाने सांगितले आहे. चीन हा देश तैवानला स्वतंत्र देश मानत नाही. तैवान हा चीनपासून वेगळा झालेला एक प्रदेश असून तो चीनचाच एक भाग आहे, अशी चीनची भूमिका आहे. त्यामुळेच चीनकडून या देशावर वेगवेगळ्या माध्यमातून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळेच लष्करी विमाने, युद्धनौकांच्या माध्यमातून तैवाणवर दबाव वाढण्याचा चीनचा हा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे.
चीनने याआधी एका दिवसापूर्वी चीनने तब्बल 16 विमाने, नौसेनेची आठ जहाजे तैवानच्या दिशेने पाठवली होती. यातील 13 विमानांनी तैवानच्या हवाई क्षेत्रात प्रवेश केला होता. त्यानंतर आता सलग दुसऱ्या रात्रीदेखील चीनने लढाऊ विमाने आणि युद्धनौका तैवानच्या दिशेने पाठवल्या आहेत. त्यामुळे सध्या तिथे काहीशी तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.