
China And Japan War : संपूर्ण जग हमास आणि इस्रायल यांच्यातील युद्धातून नुकतेच सावरू लागले आहे. अजूनही युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्ध थांबलेले नाही. या दोन युद्धांमुळे संपूर्ण जगाचे मोठे नुकसान झालेले आहे. आता नव्याने कोणतेही युद्ध पेटू नये यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. असे असतानाच आता संपूर्ण जगाचं टेन्शन वाढवणारी घटना समोर आली आहे. भारताचे शेजारील राष्ट्र चीन जपानविरोधात युद्ध छेडण्याच्या तयारीत आहे. चीनी समुद्रात तशा प्रकारच्या हालचाली चालू आहेत. चीनच्या याच भूमिकेमुळे आता खळबळ उडाली असून जपान हा देशदेखील चीनच्या आगळीकीली जशास तसे उत्तर देण्यासाठी तयार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार जपानच्या पंतप्रधान साने ताकाईची यांनी तैवानविषयी केलेल्या विधानानंतर चीनने आक्रमक पवित्रा धारण केला आहे. चीनने जपानविरोधात कारवाई करायला सुरुवात केली आहे. साने ताकाईची यांच्या विधानानंतर चीनने चीनी समुद्रातील वादग्रस्त सेंकाकू बेटांच्या जवळ आपले सैन्य तैनात केले आहे. सेंकाकू बेटांवर सध्या जपानचे प्रशासन आहे. याच बेटांच्या आसपास चीनचे चार सशस्त्र कोस्ट गार्ड जहाज दिसून आले. सेंकाकू बेटांना चीनमध्ये दियाओयू म्हटले जाते. हे बेट आमचे असल्याचा दावा चीनकडून केला जातो. गेल्या काही महिन्यांपासून या भागात चीनी जहाजांची गस्त वाढलेली आहे. चीनचे अधिकार आणि हीत लक्षात घेऊन आम्ही सागरात गस्त घातली असे कोस्ट गार्डचे मत आहे. तर दुसरीकडे चीनच्या या कारवाईमुळे वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे. चीनचे हे कृत्य वाद भडकवण्यासाठी कारणीभूत ठरू शकते, असे जपानने म्हटले आहे.
जपानच्या पंतप्रधान साने ताकाईची यांनी जपानच्या संसदे तैवानविषयी भाष्य केले. तैवानवर चीनने सैन्याच्या माध्यमातून हल्ला केला तर जपानी सैन्य त्याला प्रत्युत्तर देऊ शकते, असे ताकाईची म्हणाल्या होत्या. त्यांच्या याच प्रतिक्रियेला चीनने गांभीर्याने घेतले आहे. ताकाईची यांनी त्यांचे हे विधान मागे घ्यावे, अशी मागणी चीनने केली आहे. सोबतच ताकाईची यांच्या या विधानानंतर रविवारी चीहून जपानला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि सध्या जपानमध्ये शिक्षणासाठी वास्तव्यास असलेल्या चीनी नागरिकांना सध्या घडत असलेल्या घडामोडींवर लक्ष ठेवावे, असे आवाहन केले आहे.
दरम्यान, चीनच्या या आक्रमक धोरणामुळे भविष्यात तणावा वाढू शकतो. चीनच्या सैन्याच्या हालचाली अशाच चालू राहिल्या तर जपानदेखील आपल्या सैन्याला सतर्कतेचा आदेश देऊन चोख प्रत्युत्तर देण्याच आदेश दिला जाऊ शकतो. त्यामुळे भविष्यात चीन-जपान यांच्यात युद्धाचे ढग गडत होत आहेत का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.