
Iran Israel War : अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे जग हादरले आहे. अमेरिका आणि इस्रायल हे दोन्ही देश मिळून इराणवर क्षेपणास्त्र, ड्रोन हल्ले करत आहेत. या हल्ल्यांमुळे आतापर्यंत इराणमध्ये 700 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च धर्मगुरू अयातुल्ला अली खामेनेई यांचाही मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर युद्धाचा भडका जास्तच भडकला असून आखाती देशही युद्धात भरडले जात आहेत. चीनसारख्या देशाने या युद्धाबद्दल नाराजी व्यक्त करत इराणची बाजू घेणारी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, हे युद्ध भडकलेले असतानाच आता चीनने सर्वांनाच चकित करणारा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे चीनच्या मनात नेमकं काय आहे? असा सवाल उपस्थित केला जातोय.
जगात सध्या युद्धामुळे मोठा तणाव आहे. असे असताना आता चीनने आपल्या सैन्याला बळकटी देण्याचे ठरवले आहे. चीनने गुरुवारी आपल्या संरक्षण बजेटमध्ये 10 टक्क्यांनी वाढ केली आहे. या वाढीसह आता चीनच्या संरक्षण बजेटचा आकडा 275 अब्ज अमेरिकन डॉलरपर्यंत पोहोचला आहे. याआधीच्या संरक्षण निधीच्या तुलनेत नवा निधी हा 25 अब्ज डॉलरपेक्षा जास्त आहे. आपल्या लष्करात आधुनिकीकरण घडवून आणणे तसेच अमेरिकन सैन्याची बरोबर करणे असा यामागचा उद्देश आहे. चीन आपल्या संरक्षण निधीमध्ये सातत्याने वाढ करत असल्याने आता या देशाच्या शेजारी राष्ट्रांनाही संरक्षण क्षेत्रात आपली शक्ती आणखी वाढवणे गरजेचे होऊन बसले आहे. अमेरिकेनंतर चीनचे संरक्षण क्षेत्रातील बजेट हे सर्वाधिक मोठे आहे. 2024 साली चीनने आपल्या संरक्षण बजेटमध्ये 7.2 टक्क्यांची वाढ करून 232 अब्ज डॉलर्सपर्यंत तरतूद केली होती.
दरम्यान, सध्या चालू असलेल्या इराण आणि इस्रायलच्या युद्धात चीनने अद्याप उडी घेतलेली नाही. परंतु चीनने अमेरिकेच्या भूमिकेला विरोध केलेला आहे. त्यामुळे युद्धाचा भडका उडालाच तर भविष्यात काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.