
China K Visa : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे ‘अमेरिका फस्ट’ या धोरणाअंतर्गत अनेक धक्कादायक निर्णय घेताना दिसत आहेत. त्यांनी अनुकेतच भारतासोबतची व्यापार तूट भरून काढण्यासाठी 50 टक्के टॅरिफ लादला आहे. हा टॅरिफ अद्याप मागे घेण्यात आलेला नाही. दुसरीकडे ट्रम्प यांनी एचवनबी व्हिसाच्या शुल्कामध्येही मोठी वाढ केली आहे. या शुल्कवाढीचा सर्वाधिक फटका भारतीयांनाच बसला आहे. अमेरिकेत जाऊन जास्त पगाराची नोकरी करण्याचे अनेकांचे स्वप्न ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे धुळीस मिळाले आहे. दरम्यान, आता ट्रम्प यांच्या या धोरणाचा फायदा घेण्यासाठी चीनकडून मोठी चलाखी केली जात आहे. परदेशातील कुशल कामगारांना आकर्षित करण्यासाठी चीनने आता K व्हिसा (के व्हिसा) आणला आहे.
चीनने आणलेल्या के व्हिसाची सध्या सगळीकडेच चर्चा होत आहे. या के व्हिसाची तुलाना अमेरिकेतील एचवनबी व्हिसाशी केली जात आहे. जगभरातील प्रतिभावान, विद्वान लोकांना आकर्षित करण्यासाठी तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात प्रगती करण्यासाठी चीनने हा व्हिसा आणला आहे. तसं पाहायचं झालं तर चीनच्या या के व्हिसाचा अमेरिकेच्या एचवनबी व्हिसाशी थेट असा संबंध नाही. ट्रम्प यांनी एचवनबी व्हिसाच्या शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतण्याआधीच ऑगस्ट महिन्यात चीनने हा व्हिसा आणलेला आहे. 7 ऑगस्ट रोजी चीनने या व्हिसाची घोषणा केली होती. मात्र ट्रम्प यांनी एचवनबी व्हिसाबाबत घेतलेल्या निर्णयामुळे चीनच्या के व्हिसाला फारच महत्त्व आले आहे.
चीनला विज्ञान, तंत्रज्ञान क्षेत्रात आणखी प्रगती करायची आहे. त्यामुळे हे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी परदेशातील तज्ज्ञ, हुशार लोकांनी आपल्या देशात यावे, असा चीनचा उद्देश आहे. चीनच्या या धोरणाबाबत त्या देशाचे परराष्ट्रमंत्री गुओ जियाकून यांनी सविवस्तर प्रतिक्रिया दिली आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, गणित, अभियांत्रिकी याक्षेत्रातील ज्ञानाची देवाणघेवाण व्हावी, असा आमचा उद्देश आहे. अन्य देशातून चीनमध्ये येणाऱ्या कुशल बुद्धींवतांना संधी मिळावी, अशी आमची इच्छा आहे, त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आलेला आहे, असे जियाकून यांनी सांगितले आहे.
दरम्यान, भारत तसेच इतर देशांची कोंडी करण्यासाठी ट्रंम्प यांनी अलिकडे बरेच निर्णय घेतले आहेत. आता परदेशात जाऊन नोकरी करणारे भारतीय तसेच इतर देशातील लोक अमेरिकेला पर्याय शोधत आहेत. असे असताना चीनने त्यांच्या धोरणात के व्हिसाच्या माध्यमातून आणलेली लवचिकता अशा लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. अमेरिकेत जाणारा हा तरुण आता चीनकडे आकर्षित होऊ शकतो. त्यामुळे ट्रम्प यांचं टेन्शन एका प्रकारे वाढू शकतं, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आता भविष्यात नेमकं काय होणार, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.