
रशिया आणि चीनमध्ये चांगली मैत्री आहे, मात्र ही मैत्री आता केवळ शस्त्रांची आयात-निर्यात आणि कच्च्या तेलाची खरेदी एवढ्यापुरतीच मर्यादीत राहिलेली नाहीये, एक 800 पानांचा रिपोर्ट लिक झाला आहे, ज्यामुळे संपूर्ण जगभरात खळबळ उडाली आहे, चीन आणि रशियाच्या मैत्रीने आता एक खतरनाक मोड घेतला आहे. लंडनच्या रॉयल यूनायटेड सर्व्हिसेस इंस्टीट्यूटचा एक 800 पानांचा रिपोर्ट लीक झाला आहे. या रिपोर्टमध्ये खळबळजनक दावा करण्यात आला आहे. रशिया चीनला असं सैन्य,सामान आणि ट्रेनिंग देत आहे, ज्यामुळे वेळ येताच चीन तैवानवर हल्ला करू शकेल, असं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
या रिपोर्टनुसार रशियाने चीनला उच्च-उंचीवरील पॅराशूट प्रणाली, पाणी तसेच जमिनीवर देखील चालणारे रणगाडे, आर्मर्ड कार्मिक वाहणं आणि अँटी-टँक गन पुरवण्याची तयारी दाखवली आहे, ज्याची किंमत 210 मिलियन डॉलर्स पेक्षाही जास्त आहे. एवढंच नाही तर चीनने रशियाला असं देखील सांगितलं आहे की, रशिया चीनला जी वाहनं पुरवणार आहे, त्या सर्व वाहनांमध्ये दारूगोळा देखील असणं आवश्यक आहे. ही केवळ शस्त्रांची खरेदी नसून, तैवानवर हल्ल्याचा सुनियोजित कट असल्याचा आरोप या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.
असा दावा देखील केला जात आहे की, रशिया आणि युक्रेमध्ये युद्ध सुरू आहे. त्यामुळे रशियाला सध्या पैशांची खूप गरज आहे, रशिया आपली शस्त्रं चीनला विकून त्यातून फंड उभारत आहे, मात्र रशियाचा खरा उद्देश तो नसून, जर चीन आणि तैवानचं युद्ध सुरू झालं तर अमेरिकेचं लक्ष हे आशियाकडे लागेल आणि रशियाला युक्रेनच्या आघाडीवर मोकळीक मिळेल हा उद्देश त्या मागे आहे.
दरम्यान अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांकडून देखील यापूर्वीच अनेकदा असे संकेत देण्यात आले आहेत की, चीन तैवानवर 2027 पर्यंत हल्ला करू शकतो. चीनला स्वत: सूपर पॉवर म्हणून सिद्ध करायचं आहे, आणि त्यासाठीचं त्याचं लक्ष्य हे तैवान असणार आहे, असाही अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांकडून दावा करण्यात आला आहे.