चीन पुन्हा पाकिस्तानच्या मदतीला धावला, बुडती अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी अशी केली मदत

चीन नेहमीच पाकिस्तानचा मदतीसाठी धावून गेला आहे. यावेळीही चीनने पाकिस्तानसोबत आपली मैत्री जपली आहे. चीनने पाकिस्तानला दिलेल्या २.१ अब्ज डॉलर्सच्या कर्जाची मुदत संपणार होती. परंतु ही मुदत चीनने वाढवली आहे.

चीन पुन्हा पाकिस्तानच्या मदतीला धावला, बुडती अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी अशी केली मदत
| Updated on: Jun 30, 2025 | 8:09 AM

चीनने पाकिस्तानला आर्थिक संकटातून वाचवण्यासाठी पुन्हा एकदा मोठे पाऊल उचलले आहे. चीनने पाकिस्तानला दिलेले ३.४ अब्ज डॉलर्सचे कर्ज रोलओवर केले आहे. तसेच मध्य पूर्व बँका आणि इतर बहुपक्षीय वित्तीय संस्थांकडून अलिकडेच मिळालेल्या कर्जामुळे पाकिस्तानचा परकीय चलन साठा १४ अब्ज डॉलर्सपर्यंत वाढला आहे. दीर्घकाळापासून संकटात असणाऱ्या पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेसाठी ही दिलासादायक बातमी आहे.

चीनने अशी केली मदत

चीन नेहमीच पाकिस्तानचा मदतीसाठी धावून गेला आहे. यावेळीही चीनने पाकिस्तानसोबत आपली मैत्री जपली आहे. चीनने पाकिस्तानला दिलेल्या २.१ अब्ज डॉलर्सच्या कर्जाची मुदत संपणार होती. परंतु ही मुदत चीनने वाढवली आहे. तसेच पाकिस्तानने दोन महिन्यांपूर्वी परतफेड केलेले १.३ अब्ज डॉलर्सचे आणखी एक व्यावसायिक कर्ज देखील चीनने पुनर्वित्त केले आहे. हे पाऊल पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेसाठी खूप महत्वाचे आहे. यामुळे पाकिस्तानच्या परकीय चलन साठ्यावर असणारा दबाव कमी झाला आहे. चीनने कर्ज रोलओव्हर केल्यामुळे पाकिस्तानचा परकीय चलन साठा आता १४ अब्ज डॉलर्सच्या लक्ष्यापर्यंत पोहोचला आहे. ज्याचे निकष आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने ३० जूनपर्यंत निश्चित केला होता.

आयएमएफकडून होत्या अटी

गेल्या काही वर्षांत पाकिस्तानच्या परकीय चलन साठ्यात लक्षणीय घट झाली होती. त्यामुळे पाकिस्तानला घेतलेले कर्ज फेडण्यात अनेक वेळा अडचणी आल्या. आयएमएफने पाकिस्तानला सांगितले होते की, पाकिस्तनचा परकीय चलन साठा किमान १४ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त असावा. हे लक्ष्य साध्य करण्यासाठी, चीनने केलेले कर्ज रोलओव्हर आणि मध्य पूर्वेकडून मिळालेली मदत खूप महत्त्वाची होती. चीनकडून मिळालेल्या या मदतीपूर्वी पाकिस्तानला मध्य पूर्वेतील व्यावसायिक बँकांकडून १ अब्ज डॉलर्स आणि काही बहुपक्षीय वित्तीय संस्थांकडून ५०० दशलक्ष डॉलर्सचे कर्ज मिळाले.

पाकिस्तान सरकारने आपली अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. त्यासाठी पाकिस्ताने कर सुधारणा करणे, अनुदाने कमी करणे यासारखी पावले उचलली आहे. आयएमएफने दिलेल्या ७ अब्ज डॉलर्सच्या मदत पॅकेज अंतर्गत केलेल्या अटीनंतर हे सर्व उपाय केले गेले आहे.