
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांच्यामध्ये शुक्रवारी महत्त्वाची बैठक पार पडली. रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या तीन वर्षांपासून युद्ध सुरू आहे, या युद्धामध्ये आतापर्यंत प्रचंड मनुष्य आणि वित्तहानी झाली आहे. दरम्यान रशिया आणि युक्रेनमधील युद्धविरामाच्या चर्चेसाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र या बैठकीमधून ठोस असं काही समोर आलं नाही. परंतु दुसरीकडे आता अमेरिकेतून मोठी बातमी समोर आली आहे.
वॉशिंग्टन डीसीमध्ये नॅशनल गार्ड्स तैनात करण्यात आले आहेत, परंतु या निर्णयाला अमेरिकेतील हजारो लोकांनी विरोध केला आहे. येथील नागरिकांनी एकत्र येत थेट व्हाईट हाऊसवर मोर्चा काढला. तसेच आंदोलकांकडून यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी 12 ऑगस्ट रोजी वाशिंग्टनमध्ये 800 नॅशनल गार्ड्स तैनात करण्याचे आदेश दिले होते. नॅशनल गार्ड्स तैनात केल्यामुळे वाशिंग्टनमध्ये बिघडत चालेली कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती सुधारेल असं त्यावेळी ट्रम्प यांनी म्हटलं होतं, मात्र या निर्णयाला आता तेथील नागरिकांकडून प्रचंड विरोध होताना दिसत आहे. आंदोलक चांगलेच आक्रमक झाले आहेत.
या आंदोलकांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली, वाॉशिंग्टनमध्ये लागू करण्यात आलेली क्राईम इमरजेंसी हटवण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली. वॉशिंग्टनच्या प्रसिद्ध ड्यूपॉन्ट सर्कलपासून सुरू झालेला हा मोर्चा व्हाइट हाऊसवर येऊन धडकला, समस्या सुटण्याऐवजी नॅशनल गार्ड्समुळे समस्या आणखी वाढवल्याचा आरोप देखील यावेळी आंदोलकांनी केला आहे, त्यामुळे हा निर्णय मागे घेण्यात यावा अशी या नागरिकांची मागणी आहे. त्यामुळे ट्रम्प आता यावर काय निर्णय घेणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान एकीकडे डोनाल्ड ट्रम्प सध्या रशिया आणि युक्रेनचा प्रश्न सोडवण्यात व्यस्त आहेत, मात्र दुसरीकडे आता अमेरिकेमध्येच आंदोलन पेटलं आहे. त्यामुळे ट्रम्प आता आपल्या देशातील हा प्रश्न कसा सोडवणार? या आंदोलनानंतर नॅशनल गार्ड्स तैनातीचा निर्णय मागे घेणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.