डोनाल्ड ट्रम्प यांच्या 100 टक्के टॅरिफच्या निर्णयाने या भारतीय कंपन्यांना धक्का, थेट परिणाम, आता..

Trump Tariff on Drugs : डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून निर्यात होणाऱ्या औषध कंपन्यांवर अत्यंत मोठा टॅरिफ लावत धक्का दिला. भारतातून मोठ्या प्रमाणात औषधांची निर्यात अमेरिकेत केली जाते. एक मोठी बाजारपेठ भारतीय कंपन्यांसाठी अमेरिका होती.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या 100 टक्के टॅरिफच्या निर्णयाने या भारतीय कंपन्यांना धक्का, थेट परिणाम, आता..
Donald Trump
| Updated on: Sep 26, 2025 | 8:02 AM

डोनाल्ड ट्रम्प हे एका मागून एक टॅरिफचे बॉम्ब फोडतच आहेत. आता त्यांनी परदेशी औषधांवर तब्बल 100 टक्के टॅरिफ लावण्याचा धक्कादायक निर्णय घेतला. यापूर्वी त्यांनी भारतीय वस्तूंवर 50 टक्के टॅरिफ लावला, ज्याने अमेरिकेत होणारी 70 टक्के निर्यात बंद झाली. अमेरिकेत फक्त भारतच नाही तर अनेक देश औषधे निर्यात करतात. मात्र, आता औषधांवर तब्बल 100 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतल्याने ही निर्यात कमी होणार हे स्पष्ट आहे. शुक्रवारी, डोनाल्ड ट्रम्प यांनी औषध उत्पादनांच्या आयातीवर 100 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली. डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या या निर्णयाचा थेट परिणाम हा भारतीय औषध निर्माण कंपन्यांवर होणार आहे. कारण भारतातून औषधांची मोठी निर्यात अमेरिकेत केली जाते. सुरूवातीला 50 टक्के लावलेल्या टॅरिफमध्ये त्यांनी औषध कंपन्यांना वगळले होते. मात्र, आता औषध कंपन्यांना देखील 100 टक्के टॅरिफ भरावा लागेल.

अमेरिका ही भारताची सर्वात मोठी औषध निर्यात बाजारपेठ आहे. अमेरिकेत जेनेरिक औषधांची मागणी खूप आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे 100 टक्टे शुल्क प्रामुख्याने ब्रँडेड आणि पेटंट असलेल्या औषधांवर केंद्रित आहे. त्यामुळेच याचा थेट परिणाम भारतीय औषध उत्पादन कंपन्यांवर होईल. जेनेरिक आणि स्पेशॅलिटी औषधांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये भारताचे वर्चस्व आहे.

1 ऑक्टोबर 2025 पासून लावण्यात आलेल्या टॅरिफमुळे भारतीय कंपन्यांचे नुकसान होणार हे यावरून स्पष्ट आहे. 2025 च्या पहिल्या सहामाहीत भारताने अमेरिकेला 3.7 अब्ज डॉलर्स म्हणजे अंदाजे 32,505 कोटी रुपयांची औषधे निर्यात केली. 2024 मध्ये भारताने अमेरिकेला 3.6 अब्ज डॉलर्स म्हणजे अंदाजे 31, 626 कोटी रुपये किंमतीची औषधे निर्यात केली.

अरबिंदो फार्मा, सन फार्मा, ल्युपिन सारख्या कंपन्यांना अमेरिकेच्या बाजारपेठेचा मोठा फायदा झालाय. या काही कंपन्या पूर्णपणे अमेरिकन बाजारपेठेवर अवलंबून आहेत, ज्या भारतीय आहेत. या कंपन्यांना उत्पादनांचा मोठा भाग हा अमेरिकेतून मिळतो. आता 100 टक्के टॅरिफमुळे त्यांचा उत्पादन थेट घटण्याची शक्यता आहे. आता यामधून भारत सरकार नेमका काय मार्ग काढणार याकडे फार्मा कंपन्यांच्या नजरा आहेत.