
Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह अन्य काही देशांवर टॅरिफ लावला आहे. ते दुसरीकडे युक्रेन-रशिया यांच्यातील युद्धालाही थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. रशिया आणि युक्रेनच्या अध्यक्षांसोबत त्यांनी बैठकाही घेतल्या आहेत. विशेष म्हणजे इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्ध थांबावे म्हणून अमेरिकेने बळाचाही वापर केला आहे. अधूनमधून ट्रम्प हे युद्धाची धमकीही देत असतात. दरम्यान, आता ट्रम्प यांनी एका मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्या या भूमिकेमुळे अमेरिकेतील नागरिकांसह जगातील इतर देशांनाही अनेक प्रश्न पडले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार डोनाल्ड ट्रम्प हे पेंटागॉनचे नाव बदलून ‘डिपार्टमेंट ऑफ वॉर’ असे ठेवण्याचा विचार करत आहेत. अमेरिकेला आता संरक्षणाची गरज नाही. आपल्या देशाला आक्रमण करण्याचीही गरज आहे, त्यामुळेच पेंटागॉनचे नाव बदलायला हवे, असे मत ट्रम्प यांनी व्यक्त केले आहे. तसेच आगामी काही दिवसात याबाबतची घोषणा होऊ शकते, अशी माहितीही ट्रम्प यांनी दिली आहे. ट्रम्प यांनी दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती ली जे म्यूंग यांच्यासोबत एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पेंटागॉनच्या नामकरणावर भाष्य केले.
“आपण जेव्हा प्रथम आणि द्वितीय विश्वयुद्ध जिंकले होते तेव्हा पेंटागॉन हा युद्धविभाग म्हणून ओळखला जायचा. खरं म्हणजे माझ्यासाठी अजूनही हा विभाग युद्धविभागच आहे. ही जागा जेव्हा युद्धविभाग म्हणून ओळखली जायची तेव्हा आपल्याकडे विजयाचा एक अविश्वसनीय इतिहास होता, असे प्रत्येकालाच वाटते. नंतरच्या काळात या विभागाचे नाव बदलून संरक्षण विभाग असे ठेवण्यात आले,” असे ट्रम्प यावेळी म्हणाले. तसेच मला फक्त संरक्षण विभाग नको आहे. अमेरिकेला हल्लादेखील करायचा आहे, असे सांगत त्यांनी लवकरच पेंटागॉनचे नाव बदलून डिपार्टमेंट ऑफ वॉर असे ठेवले जाईल, असे सूचित केले.
दरम्यान, आता डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या या विधानानंतर वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. पेंटागॉनचे नाव बदलून डिपार्टमेंट ऑफ वॉर करण्यामागे ट्रम्प यांचा नेमका उद्देश काय आहे? यातून नेमके काय साध्य होणार आहे? असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत.