
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आपल्या निर्णयांमुळे नेहमीच चर्चेत असतात. सध्या ते ग्रीनलँडच्या मुद्द्यांवरून चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक मंचाला हजेरी लावली. या कार्यक्रमात त्यांनी जोरदार भाषण केले. यावेळी समोर आलेल्या फोटोमुळे ट्र्म्प यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. कारण ट्रम्प यांच्या हातावर एक जखम दिसली. यामुळे ट्रम्प यांच्या प्रकृतीबद्दल पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. आता याबाबत व्हाईट हाऊसने स्पष्टीकरण दिले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
समोर आलेल्या फोटोमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या डाव्या हातावर एक जखम दिसली. त्यांचा हात काळा निळा झाला होता. दावोस शिखर परिषदेवरून परतताना पत्रकारांनी ट्रम्प यांना या जखमेबाबत प्रश्न विचारला. यावर बोलताना ट्रम्प यांनी ही जखम एका किरकोळ अपघातामुळे झाली असल्याची माहिती दिली. ‘माझा हात टेबलावर आदळला त्यामुळे ही जखम झाली. त्यानंतर त्यावर क्रीम लावली होती. आता मी पूर्णपणे ठीक आहे.’
हाताच्या जखमेबाबत अधिक माहिती देताना ट्रम्प म्हणाले की, हातावर जखम होण्याचे आणखी एक कारण म्हणजे मी नियमित अॅस्पिरिनचे सेवन करतो. अॅस्पिरिन घेतल्याने जखम होण्याचा धोका वाढतो.जेव्हा तुम्ही मोठी अॅस्पिरिन घेता तेव्हा ते म्हणतात की त्यामुळे सहजपणे जखम होतात. मात्र डॉक्टरांनी मला सांगितले आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात औषध घेण्याची आवश्यकता नाही. मला कोणताही धोका पत्करायचा नाही त्यामुळे मी औषध घेत आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आरोग्याच्या प्रश्नावर बोलताना व्हाईट हाऊसनेही उत्तर दिले आहे. प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी एका निवेदनात म्हटले की, ‘ट्रम्प यांचा हात टेबलाच्या कोपऱ्यावर आदळला, ज्यामुळे जखम झाली आहे.’ दरम्यान, ट्रम्प यांच्या हाताला यापूर्वीही जखम झाली होती. त्यावेळी त्यांनी आपला हात मेकअप किंवा पट्टीने झाकला होता. त्यावेळीही ट्रम्प यांनी अॅस्पिरिनचा जास्त डोस घेतल्यामुळे ही जखम झाली असल्याचे म्हटले होते.