Tariff : टॅरिफमधून मार्ग निघणार? मोठे संकेत, भारताच्या प्रयत्नांना यश मिळण्याची शक्यता…

Donald Trump Jason Miller Meeting : सध्या भारत-अमेरिकेदरम्यान टॅरिफच्या मुद्यावरून वातावरत तापलेलं असून या वादावर तोडगा काय निघणार याकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे.त्याचदरम्यान सरकारचे लॉबिस्ट जेसन मिलरने वॉशिंग्टनमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. भारताने मिलरच्या कंपनीला कॉन्ट्रॅक्टवर नियुक्त केलं आहे. त्याच मिलरची ट्रम्पशी भेट झाल्यामुळे आता भारत-अमेरिका व्यापार तणाव राजनैतिक पद्धतीने सोडवला जाईल अशी आशा आहे.

Tariff : टॅरिफमधून मार्ग निघणार? मोठे संकेत, भारताच्या प्रयत्नांना यश मिळण्याची शक्यता...
जेसन मिलरने घेतली डोनाल्ड ट्रम्पची भेट
Image Credit source: social media
| Updated on: Sep 08, 2025 | 9:20 AM

अलिकडच्या काही महिन्यांत भारत आणि अमेरिकेदरम्यान वाढलेल्या टॅरिफ वाद आणि व्यापार तणावामुळे दोन्ही देशांमध्ये विस्तव जात नाहीये. मात्र याच वादाच्या एर्श्वभूमीवर एक मनोरंजक राजनैतिक खेळी समोर आला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे मानले जाणारे राजकीय रणनीतीकार आणि लॉबीस्ट, जेसन मिलर यांनी अलीकडेच ट्रम्प आणि त्यांच्या टीमची भेट घेतली. आता हे वाचून तुम्ही म्हणाल की त्यात काय खास ? तर यातील विशेष गोष्ट म्हणजे SHW Partners LLC या जेसन मिलरच्या फर्मशी, भारताने या वर्षी एप्रिलमध्ये एका वर्षासाठी 1.8 दशलक्ष डॉलर्सचे कॉन्ट्रॅक्ट केले होते. अमेरिकन सत्तेच्या कॉरिडॉरमध्ये भारतासाठी ‘लॉबिंग ब्रिज’ म्हणून याकडे पाहिले जात आहे.

मिलरच्या सक्रियतेमुळे उघडणार नवे दरवाजे ?

मिलरने व्हाईट हाऊसमधून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ज ट्रम्प यांच्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. “वॉशिंग्टनमध्ये एक अद्भुत आठवडा गेला. अनेक मित्रांना भेटलो आणि आठवड्यातील मुख्य आकर्षण म्हणजे राष्ट्रपतींना ॲक्टिव्ह पाहणं” अशी कॅप्शनही त्यानी लिहीली. भलेही या भेटीमागचा अधिकृत अजेंडा अद्याप समोर आलेला नाही, सार्वजनिक करण्यात आला नाही, मात्र ट्रम्प आणि मिलर यांच्या भेटीची वेळ खूप महत्वाची आहे. तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे ती, ट्रम्प प्रशासन भारतातील स्टील, अॅल्युमिनियम आणि इतर वस्तूंवरील शुल्काबाबत कठोर भूमिका घेत असताना, मिलरची सक्रियता नवीन शक्यतांची दारे उघडू शकते. वॉशिंग्टनमधील निर्णय प्रक्रियेवर थेट परिणाम करू शकणाऱ्या लोकांशी संवाद साधणे भारतासाठी महत्त्वाचे आहे. सध्या भारत-अमेरिका व्यापार संबंध आणि शुल्क पुन्हा एकदा चर्चेत आहेत आणि दोन्ही देशांच्या आर्थिक धोरणांवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

व्यापारिक तणाव कमी होण्याची शक्यता

दिल्लीच्या धोरणात्मक वर्तुळातील लोकांचा असाही विश्वास आहे की मिलर यांनी ट्रम्प यांची घेतलेली ही भेट साधीसुधी नसून, तो येत्या काही महिन्यांत व्यावसायिक चर्चेसाठी वातावरण तयार करण्याचा प्रयत्न आहे.या लॉबिंगमुळे दोन्ही देशांमधील व्यापारातील अडथळे कमी होतील आणि टॅरिफ वाद सोडवण्यासाठी ठोस पावले उचलली जातील असा भारताला विश्वास आहे. भारताचा हा ‘दूत’ अमेरिकेसोबतचा व्यापारी तणाव कमी करण्यास मदत करेल का? असा प्रश्न सध्या असून त्याचे उत्तर येणारा काळच सांगेल, परंतु हे निश्चित आहे की वॉशिंग्टनच्या सत्तेच्या राजकारणात भारताची उपस्थिती आता अधिक स्पष्ट होत आहे.

जेसन मिलर कोण ?

जेसन मिलर यांचे ट्रम्प यांच्याशी दीर्घकाळापासून जवळचे संबंध आहेत आणि 2016 च्या निवडणुकीत ते त्यांचे मुख्य मीडिया प्रवक्ते होते. त्यांना व्हाईट हाऊस कम्युनिकेशन्स डायरेक्टर बनवले जाणार होते, परंतु वैयक्तिक वाद आणि आरोपांमुळे त्यांना पदावरून पायउतार व्हावे लागले. अनेक आरोपांनंतरही ते ट्रम्प यांच्या राजकीय वर्तुळात राहिले आणि 2020 व 2024 सालच्या निवडणूक मोहिमांमध्ये ते एक प्रमुख सल्लागार होते. 20202 साली त्यांनी SHW Partners LLC ची स्थापना केली आणि परदेशी लॉबीस्ट म्हणून नोंदणी केली.

भारत सरकारचे मिलरशी कॉन्ट्रॅक्ट

सार्वजनिक कागदपत्रांनुसार, भारत सरकारने एप्रिल 2025 मध्ये जेसन मिलरच्या SHW पार्टनर्स LLC या फर्मची एका वर्षाच्या करारावर नियुक्ती केली होती.

कराराची रक्कम: 1.8 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 15 कोटी रुपये)

मासिक शुल्क: 1,50,000 डॉलर्स

काम: अमेरिकन सरकार, काँग्रेस, थिंक टँक, शैक्षणिक संस्था आणि इतर भागधारकांसह भारतासाठी धोरणात्मक सल्लामसलत आणि सरकारी संबंध समर्थन प्रदान करणे.

सध्या भारत आणि अमेरिकेत टॅरिफवरून तणाव आहे. अशा परिस्थितीत, जेसन मिलरची ट्रम्प यांच्याशी झालेली भेट आणि भारत सरकारने त्यांना लॉबीस्ट बनवणे हे राजनैतिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे मानले जाते. त्यांच्या या भेटीचा भारताला काय फायदा होतो हे येत्या काळातच समजू शकेल.