
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला सर्वात मोठा दिलासा दिला आहे. अमेरिकेने भारतीय मसाले आणि चहावरील टॅरिफ कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारतातील मसाला व्यापारी आणि चहा उत्पादकांना लाभ होण्याची शक्यता आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी जवळपास 200 फूड आणि शेती उत्पादनांवरील आयात शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. जास्त टॅरिफमुळे अमेरिकेत महागाई वाढली. जनता त्रस्त झाली. त्यामुळे ट्रम्प प्रशासनावर दबाव वाढला. त्याच पार्श्वभूमीवर अमेरिकन सरकारने हा निर्णय घेतला आहे. काळी मिरी, लवंग, जीरा, वेलची, हळद, आलं, चहा, आंब्याची उत्पादनं, काजू या प्रोडक्ट्सवरील टॅरिफ कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने 2024 मध्ये अमेरिकेत 50 कोटी डॉलर्सपेक्षा जास्त मसाल्याची निर्यात केली. यात चहा-कॉफीची निर्यात जवळपास 8.3 कोटी डॉलरची होती. अमेरिकेने जागतिक स्तरावर 84.3 कोटीचा काजू आयात केला. यात 5 वा हिस्सा भारताचा होता.
भारताला कृषी क्षेत्रातून सर्वाधिक महसूल मिळवून देणाऱ्या उत्पादनांपर्यंतच ट्रम्प प्रशासनाचा हा निर्णय मर्यादीत आहे. झिंगा, समुद्र खाद्यं उत्पादनं आणि बासमती तांदूळ अशी उच्च मूल्य असलेल्या उत्पादनांवर अजून दिलासा दिलेला नाही. भारतीय रत्न, आभूषण आणि कपडे यांच्यावरील 50 टक्के टॅरिफ कायम आहे. भारत-अमेरिकेत ट्रेड डील होत नाही, तो पर्यंत अन्य उत्पादनांना दिलासा मिळण्याची शक्यता कमी आहे. भारत रशियाकडून स्वस्तात तेल खरेदी करत होता. त्यामुळे रशियाला युक्रेन विरोधात युद्ध सुरु ठेवण्यासाठी बळ मिळतं असा पोकळ दावा करुन ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ आकारला.
किती कॅटेगरीला लाभ मिळणार?
नवी दिल्लीतील अधिकाऱ्यांनुसार, अमेरिकेच्या या निर्णयाचा जवळपास 50 प्रोसेस्ड फूड कॅटेगरीला अधिक लाभ मिळेल. यांचं निर्यात मूल्य मागच्यावर्षी अंदाजित 491 मिलियन डॉलर होतं. यात कॉफी, चहाचा अर्क, कोको-बेस्ड प्रोडक्ट उत्पादन, फळांचा रस, आंब्यापासून बनलेल्या वस्तू आणि वनस्पती उत्पादने यांचा समावेश होता.359 मिलियन डॉलर मूल्य असलेल्या मसाल्यांनाही लाभ होईल अशी अपेक्षा आहे. अन्य 48 प्रकारांमध्ये फळ आणि मेवे, यात नारळ, आंबे, काजू, केळी, सुपारी आणि अननस यांचा समावेश होतो. या उत्पादनांचं निर्यात मुल्य केवळ 55 मिलियन डॉलर होतं.
ट्रम्प यांना हा निर्णय का घ्यावा लागला?
अमेरिकेत वाढत्या महागाईमुळे चिंता वाढत असताना ट्रम्प प्रशासनाने हा निर्णय घेतला. ट्रम्प यांना अमेरिकी मतदारांच्या नाराजीचा सामना करावा लागतोय. त्यामुळे अलीकडे झालेल्या पोटनिवडणुकीत रिपब्लिकन पार्टीला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. अमेरिकी जनतेचा रोष लक्षात घेऊन ट्रम्प यांनी टॅरिफमधून मिळणाऱ्या रेवेन्यूमधून अमेरिकी नागरिकांना 2,000 डॉलर देण्याचा निर्णय घेतला आहे.